वैनाकाठ फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न
भंडारा: गोसेखुर्द धरणामुळे दोनशे गाव प्रभावी झाले आहेत. आज धरण पूर्णपणे भरल्यानंतर अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसला आहे. शासनाने या बॅकवॉटरबाधितांना पूरग्रस्त ठरविले आहे जेव्हा की, हे सगळे प्रकल्पबाधित आहेत. शासनाने यांना प्रकल्पबाधिताप्रमाणे मदत द्यावी असे प्रतिपादन मेधा पाटकर यांनी केले.त्या भंडारा येथे आयोजित वैनाकाठ फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.
युगसंवाद चळवळीद्वारा आयोजित वैनाकाठ फाऊंडेशन भंडारा च्या राज्यस्तरीय साहित्य,समाज व शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक वाचनालय भंडाराच्या इंद्रराज सभागृहात करण्यात आले होते.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैनाकाठ फाउंडेशनचे अध्यक्ष अमृत बन्सोड होते.पुरस्कार वितरण महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल हे होते. विशेष संबोधक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर उपस्थित होत्या. याप्रसंगी वैनाकाठ फाउंडेशनच्या वतीने मुकुंदराज काव्य पुरस्कार अक्षय शिंपी मुंबई,घनश्याम डोंगरे कथा पुरस्कार पंकज कुरुलकर मुंबई,ना.रा.शेंडे कादंबरी पुरस्कार योगीनी वेंगुर्लेकर,पुणे, अनिल नितनवरे समीक्षा पुरस्कार प्रा.चंद्रकार बाबर सांगली,डॉ.आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार अस्मिता जोशी-राजे पुणे यांना रोख पाच हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महात्मा कालिचरण नंदागवळी समाजमित्र पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना तर जे.पी.नाईक शिक्षणमित्र पुरस्कार श्रीकांत एकुडे, ससा जिल्हा चंद्रपूर ब्राईट एज फाउंडेशन,मॅजिक फाउंडेशन यांना अकरा हजार रुपये रोख,मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी सार्वजनिक वाचनालय भंडाऱ्याच्यावतीने म.रा.विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे,ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांचा सन्मानचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
डाॅ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या भाषणातून वैनाकाठ फाउंडेशनने सुरू केलेल्या साहित्य समाज व शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारामुळे साहित्यिकांना,समाजसेवा व शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्यांना ऊर्जा व प्रेरणा मिळून भविष्यात त्यांचे हातून मोठे कार्य होईल असे सांगितले.धनंजय दलाल यांनी गोसेखुर्द धरणग्रस्तांच्या समस्यांच्या निवारणासाठी नव्याने लढा उभारण्याची गरज असल्याचे सांगितले.
‘विस्थापन समस्या:वैनगंगा आणि नर्मदेच्या संदर्भात’या विषयावर बोलतांना मेधा पाटकर म्हणाल्या नवनिर्माण, औद्योगिक विकास यालाच विकास म्हणायचा का? मग निसर्गाच काय?आम्ही नर्मदा बचाव म्हणताना घर बचाव,घर बनाव असेही म्हणतो कारण आज विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडणे सुरु आहे.उत्तराखंडमध्ये याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. विकासाच्या नावाखाली उत्तराखंडातील जोशी मठाची झालेली अवस्था पाहिली की लक्षात येते की विकास कसा विनाशाकडे चालला आहे.संविधानातील समता व न्याय ही मूल्ये विकासाच्या नावाखाली पायदळी तुडवली जात आहेत. देशात विषमता बिभत्स रुप धारण करून उभी आहे.भारतात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या एक टक्का उद्योगपतींचे भरमसाठ कर्ज माफ केले जातात परंतु सर्वाधिक रोजगार देणाऱ्या शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जाते. शेतमालाला हमीभाव नाही तर योग्य भाव पाहिजे.आता भारतात आज एकही नदी स्वच्छ राहिलेली नाही.भारतातील एक-एक नदी वाचवणे गरजेचे आहे.नदीचे वाहत राहणे हे मानवी जीवनाच्या प्रगतीचे धोतक आहे.जगात सगळीकडे नद्यांवर बांधलेली मोठी धरणे निरस्त केली जात आहेत. स्वच्छ, शुद्ध पाण्यासाठी व पृथ्वीच्या हिरव्या आच्छादनासाठी आता सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी परीक्षकाच्यावतीने डाॅ. जगदीश गुजरकर यांनी पुरस्कार निवडीबद्दल मत व्यक्त केले.पुरस्कार प्राप्त लेखिका अस्मिता जोशी-राजे तसेच शिक्षणमित्र पुरस्कार प्राप्त श्रीकांत एकुडे यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणातून अमृत बन्सोड यांनी लेखकांनी कार्यकर्त्याच्या पातळीवर येऊन लिहायला पाहिजे त्याशिवाय प्रेरणादायी साहित्य निर्माण होऊ शकत नाही असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन डाॅ.सुरेश खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक विवेक कापगते यांनी तर मानपत्रांचे वाचन डाॅ. जयश्री सातोकर यांनी केले आभार प्रा. नरेश आंबिलकर यांनी मानले.
कार्यक्रमाला महेश लिंबाचिया मुंबई,प्रल्हाद सोनेवाणे,डाॅ. दशरथ कापगते, डाॅ. गुरुप्रसाद पखमोडे,डाॅ. गिरीश सपाटे,डाॅ. पवन कांबळी,डाॅ. के.एल.देशपांडे,डाॅ.कविता राजाभोज, युवराज गंगाराम, महात्मा कालिचरण नंदागवळी यांची नात भालाधरे मॅडम,मंगला गणवीर,डाॅ. संजयकुमार निंबेकर, नीळकंठ रणदिवे,हर्षल मेश्राम,ईश्वरलाल काबरा,विनोद आकरे, ढगे,रामेश्वर बागडे,संजय जांभुळकर चंद्रशेखर भिवगडे, अविल बोरकर,माजी नगराध्यक्ष महेन्द्र गणवीर,डाॅ.गणेश वानखेडे यासह भंडारा,गोंदिया,चंद्रपूर या जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैनाकाठचे मुख्य संयोजक प्रमोदकुमार अणेराव, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल धनश्याम कानतोडे,महेश साखरवाडे,दिनेश हरडे,युवराज साठवणे,मारोती वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले.





