गोंदिया :.प्रशासन व शासन व्यवस्थेच्या उदासीनतेविरोधातील संतापाचा आवाज आज सोशल मीडियावर सध्या गाजत असलेल्या “मै भी कॉक्रोज” च्या माध्यमातून बघावयास मिळाला.आमगाव तालुक्यातील पिपरटोला येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरडकर यांनी मनरेगा योजनेअंतर्गत केलेल्या कामाच्या मजुरीचा पेमेंट तब्बल दोन वर्षांपासून न मिळाल्याने थेट जिल्हा परिषद प्रशासकिय कार्यालय गाठत “भीक मांगो आंदोलन” करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.मात्र त्यांच्या या अनोख्या आंदोलनाकडे सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीसह कुणीही न बघता पोलिसांच्या माध्यमातून त्यांना हाकलण्याचाच प्रयत्न करीत असल्याचेही बघावयास मिळाले.
ग्रामपंचायत सदस्य गिरडकर यांनी “मै भी कॉक्रोज” असे पोस्टर, लावून डोक्यावर घमेंला,हातात भिकेचे पात्र घेऊन त्यांनी जिल्हा परिषद परिसरात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. शासनाकडून मजुरीचे हक्काचे पैसे मिळत नसतील, तर आता भीक मागूनच संसार चालवावा लागेल, अशी वेदनादायी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.सुनील गिरडकर म्हणाले की, “गरीब मजुरांनी उन्हातान्हात काम केले, पण दोन वर्षांपासून मजुरीच मिळाली नाही. प्रशासनाकडे अनेकदा विनंती केली, निवेदने दिली; मात्र कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ आली.”





