23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ ‘रस्ता कसा वाटला?’ म्हणताच आमदार भडकले

‘रस्ता कसा वाटला?’ म्हणताच आमदार भडकले

0
114
file photo
चिखलीच्या उपोषणस्थळी आमदार व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
भिवापूर : भिवापूर तालुक्यातील चिखली गावात सुरू असलेल्या रस्ता दुरुस्ती आंदोलनादरम्यान उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भिवापूर ते चिखली या सहा किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १७ मेपासून गावात उपोषण सुरू केले आहे. तीव्र उष्णतेत ग्रामस्थ आंदोलन करत असताना आमदार संजय मेश्राम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर एका दैनिकात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार मेश्राम यांनी २० मे रोजी दुपारी चिखली येथे उपोषणस्थळी भेट दिली.
यावेळी एका ग्रामस्थाने “आमदार साहेब, रस्ता कसा वाटला तुम्हाला?” असा प्रश्न विचारताच आमदार मेश्राम संतप्त झाल्याचे व्हिडिओत दिसून येते. “तू कसा बोलतो? हा फक्त तुमचाच नाही तर माझाही प्रश्न आहे. फालतू गोष्टी करू नका,” असे म्हणत त्यांनी संबंधित ग्रामस्थाला सुनावल्याचे सांगितले जात आहे.
वाद वाढत असताना आमदारांनी प्रकाश गारघाटे नावाच्या ग्रामस्थाला उपोषण मंडपातून बाहेर काढण्याचे संकेत पोलिसांना दिल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर काही युवकांनी संताप व्यक्त करत “आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही का?” असा सवाल उपस्थित केला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता भिवापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर यांनी मध्यस्थी करत संबंधित ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर वातावरण काहीसे निवळले.
दरम्यान, चिखली गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे.

blank