23.1 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ चिचगड वनपरिक्षेत्रातील गॅबियन बंधाऱ्यांमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार

चिचगड वनपरिक्षेत्रातील गॅबियन बंधाऱ्यांमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार

0
82

नवेगावबांध– चिचगड वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या गॅबियन बंधाऱ्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी काही कंत्राटदारांशी संगनमत करून नियमबाह्य पद्धतीने निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाच्या निधीवर मोठा डल्ला मारल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय डोये यांनी केला आहे.
या बांधकामांचे अधिकृत करारनामे होण्यापूर्वीच प्रत्यक्ष बांधकामे करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनीच अनौपचारिक चर्चेत ही बाब मान्य केल्याचे सांगितले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्वनियोजित पद्धतीने राबवून नियमांना हरताळ फासण्यात आल्याचा आरोप आहे. माहिती अधिकारअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून हा प्रकार उघड होण्याची शक्यता असल्यानेच संबंधित अधिकारी माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजय डोये यांनी विविध योजनांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांची माहिती, अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया, खर्चाचा तपशील, लाभार्थी व कामांची प्रशासकीय मान्यता यासंबंधी माहिती मागवली होती. मात्र, नियमानुसार माहिती न देता वेळकाढूपणा करण्यात आल्याने त्यांनी प्रथम अपील दाखल केले. एका गॅबियन बंधाऱ्यासाठी सुमारे २ लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असताना प्रत्यक्षात केवळ १५ ते २० हजार रुपयांत काम उरकून उर्वरित निधीची अफरातफर केल्याचा आरोप आहे. अनेक कामांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी लाटण्यात आल्याची चर्चा आहे.या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार वरिष्ठांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

blank