भ्रष्टाचार, अवैध वसुली आणि ओव्हरलोड वाहनांवर कारवाईची मागणी
नागपूर : नागपूर शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, अवैध वसुली आणि ओव्हरलोड वाहनांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नागपूर ग्रामीण RTO कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला. ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करून आतापर्यंत किती वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली याची माहिती सार्वजनिक करावी, तसेच संबंधित वाहनांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
नागपूर शहर (MH-31), नागपूर ग्रामीण (MH-40) आणि पूर्व नागपूर (MH-49) या विभागांच्या संयुक्त तपासणी अधिकारांच्या नावाखाली अवैध वसुली सुरू असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांकडून महिन्याच्या स्वरूपात वसुली होत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला.
कलबीर सिंग कल्सी यांच्यासह काही अधिकाऱ्यांवर बदली रॅकेट आणि अवैध वसुलीत सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडलेल्या अधिकाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
गेल्या 15 दिवसांपासून फिटनेस, परमिट आणि इतर कार्यालयीन कामे बंद असल्याचे सांगितले जात असल्याने ट्रक चालक व वाहनमालक त्रस्त असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रलंबित कामे तातडीने ऑफलाइन पद्धतीने सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय शाळा बसच्या नावाखाली खासगी बसद्वारे अवैध प्रवासी व मालवाहतूक सुरू असल्याचा आरोप करत उमरेड, चंद्रपूर, भंडारा, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या अशा वाहनांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
२४ तासांत योग्य कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला





