23.5 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home गुन्हेवार्ता बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी ४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला ग्राम महसूल अधिकारी...

बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी ४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला ग्राम महसूल अधिकारी जाळ्यात

0
133
पालघर::वसई तालुक्यातील पेल्हार-बिलालपाडा परिसरात एका मोठ्या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. घराच्या बांधकामाचा आणि जमिनीवरील माती भरणीचा पंचनामा न करण्यासाठी १ लाख ९५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी ४५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांचे मामा यांचा चाळ बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांच्या मामांनी २०१५ मध्ये बिलालपाडा येथे सर्व्हे नंबर १३/०३ मधील जमीन घेतली होती, जी सध्या न्यायप्रविष्ट आहे. या जागेवर तक्रारदार यांची १ रूम आणि त्यांच्या मामांच्या ३ रूम अशा एकूण ४ रूमचे बांधकाम करण्यात आले आहे.
​या बांधकामाचा अधिकृत पंचनामा टाळण्यासाठी बिलालपाडा/पेल्हार सजाच्या ग्राम महसूल अधिकारी श्रीमती उज्ज्वला प्रवीण पाटील (वय ४८ वर्षे) यांनी लाचेची मागणी केली होती. त्यांनी बांधकामाच्या पंचनाम्यासाठी ४५ हजार रुपये आणि जमिनीवर केलेल्या माती भरणीचा पंचनामा न करण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण १ लाख ९५ हजार रुपयांची मागणी केली होती.
​तक्रारदाराने या भ्रष्टाचाराबाबत पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत २१ आणि २२ मे २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली, ज्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज, २५ मे २०२६ रोजी दुपारी १२:५१ च्या सुमारास पेल्हार येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला.
​श्रीमती उज्ज्वला पाटील यांनी लाचेच्या एकूण रकमेपैकी ४५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) च्या कलम ७ अन्वये पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक (ठाणे एसीबी) शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे आणि त्यांचे सहकारी योगेश धारणे, जितेंद्र गवळे, गीता कहार, आकाश लोहारे, प्रकाश दळवी व विलास भोये यांचा समावेश होता.

blank