
सरपंच सचिवावर कारवाईची पत्रकार परिषदेतून मागणी
गोंदिया –स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून गाजावाजा झालेल्या तसेच अनेक योजना राबवून नाव लौकिकास आलेल्या व अनेक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गोंदिया तालुक्यातील गंगाझरी ग्राम पंचायत मध्ये कोटीचा अपहार झाल्याची तक्रार करीत सदर ग्रामपंचायतची चौकशी करून येथील पूर्व सरपंच सोनु घरडे व तत्कालीन ग्राम पंचायत अधिकारी महाकाळकर यांच्यावर शासकीय निधीची अफरातफर प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी सोमवारी (ता.25) येथील विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.
येथील पूर्व सरपंच व विद्यमान प्रशासक सोनु विनायक घरडे व तत्कालीन ग्रा.प.अधिकारी महाकाळकर यांनी वर्ष 2021ते वर्ष 2025 दरम्यान ग्राम पंचायत निधीत जवळपास तीन कोटीचा अपहार केला. त्यांनी इ-निविदा न काढता अनेक कामांची लाखो रुपयांच्या निधीची उचल केली, नियमाला तिलांजली देत आदिवासी सांस्कृतिक भवनाचे बांधकाम करून त्यातून लाखो रुपयांच्या निधींचा अपहार केला. त्यातच गावात एकदाच वृक्ष लागवड करून त्यावर ट्री गार्ड बसविले मात्र सदर वृक्ष लागवड विविध योजनेत दाखवून एकाच कामाचे अनेक वेळा बिल उचलण्यात आले. साहित्य खरेदीसाठी जी.एम. पोर्टल चा उपयोग न करता वाजवी दरापेक्षा अधिक पटीने बिल दर्शवून खुल्या बाजारातून वस्तूंची खरेदी करण्यात आली. यू. के. इलेक्ट्रिक च्या नावे निविदा नसतानाही त्या नावाने लाखोंचे देयके काढण्यात आल्याचा आरोपही उपस्थित नागरिकांनी लावला. ग्राम पंचायत मधील सदर सावळा गोंधळ माहिती अधिकारातून उघड झाली असल्याची माहिती ही उपस्थित नागरिकांनी यावेळी दिली.एव्हढेच नव्हे तर तत्कालीन सरपंच सोनु घरडे यांनी परवानगी नसतानाही टीकायतपूर येथील शासकीय जमीन लाखो रुपये घेऊन गावातील नागरिकांना विक्री केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेतून करण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी सदर प्रकरणाची लेखी तक्रार जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी तसेच राज्य शासनाकडे करण्यात आली परंतु अद्यापही अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची साधी चौकशी सुद्धा केली नाही. सरपंच सोनु घरडे यांचे एका राजकीय पक्षाशी जवळीक असल्यामुळे प्रकरण दाबण्यासाठी ते वरिष्ठ स्तरावरून हालचाली करीत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेतून लावण्यात आला. येणाऱ्या सात दिवसात नागरिकासमक्ष या ग्राम पंचायत ची चौकशी करण्यात यावी. दोषी असलेल्या पूर्व सरपंच सोनु घरडे व ग्राम पंचायत अधिकारी महाकाळकर यांच्याकडून अपहार करण्यात आलेली रक्कम वसूल करण्यात यावी, शासकीय निधी अपहार प्रकरणी या दोन्ही वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा ग्राम पंचायत समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशाराही पत्रकार परिषदेतून देण्यात आला. पत्रकार परिषदेत पूर्व ग्राम पंचायत सदस्य रामसिंग पंधरे, हेमंत बघेले, गावकरी निळकंठ गायधने योगेश पगरवार छगन लिल्हारे, नर्गेश सोरले, गौरव लिल्हारे, हितेश उईके उपस्थित होते.





