26.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ शेतकऱ्यांना हिरवळीच्या खतांचे वितरण

शेतकऱ्यांना हिरवळीच्या खतांचे वितरण

0
127

 गोरेगाव-. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंगळवारी पंचायत समितीत हिरवळीच्या खताचे वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून शासनाच्या योजनेचा लाभघेतला. शासनाच्या विविध कृषिपूरक योजनांची माहिती देत, उत्पादन खर्च कमी करून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताचा वापर महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर महारवाडे होते. यावेळी जिल्हा परिषद गोंदिया अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मण भगत ,माजी सभापती मनोज बोपचे, खंड विकास अधिकारी गौतम,तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिरवळीच्या खताचे महत्त्व, त्याचा जमिनीच्या आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी सविस्तर माहिती दिली. हिरवळीचे खत वापरल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक वाढून मातीची सुपीकता टिकून राहते, पिकांची वाढ सुधारते आणि उत्पादनात वाढ होते, असे त्यांनी स्पष्ट केले.गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीमार्फत कृषी विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी मृदा संवर्धन, सेंद्रिय शेती आणि जलसंधारण यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद गोंदिया येथील अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मण भगत यांनीही सेंद्रिय शेती ही भविष्यातील शाश्वत शेती व्यवस्था असल्याचे सांगत शासन योजनांचा लाभ घेऊन उत्पादन वाढीसोबत जमिनीचे आरोग्य जपण्याचे आवाहन केले.
उपसभापतींनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने विविध योजना राबवत असून सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक शेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल. हिरवळीच्या खताच्या वापरामुळे उत्पादन वाढीसोबतच जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

blank