अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील खांबी येथील नळाला लाल रंगाचे गढूळ पाणी येत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. भर उन्हाळ्यात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून खांबी गावातील खासगी नळधारकांना पाणीपुरवठा केला जातो.काही नळ कनेक्शनधारकांनी टिल्लू पंप लावून पाणीपुरवठा सुरू केल्याने अनेक नळधारकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तर मागील काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी गावातील महिलांना भर उन्हात पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पूर्णपणे लाल व काळ्या रंगाचा गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे खांबी नळकनेक्शनधारकांनी सांगितले. हे पाणी वापरण्या योग्य नसल्याने गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गढूळ पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी ३० मे रोजी सकाळी खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काही पदाधिकारी व कर्मचारी यांना बोलावले असता त्यांनी येऊन पाहणी केल्याची माहिती आहे. ही समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.





