
नागपूर, दि. 3 : गावातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही बांधील आहे. गावासाठी जे आवश्यक आहे ते ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठीही ग्रामपंचायत सक्षम असून दिव्यांगांच्या विकासासाठी पाच टक्के खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे. याबाबत अधिक दक्षतेने पुढे येऊन काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हा विकासाचे व्यापक नियोजन करताना गावपातळीवर लोकांना नेमक्या कोणत्या योजना अपेक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 2 जून रोजी पारशिवनी तालुक्यातील भागीमारी गटग्रामपंचायतीत मुक्कामी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान 30 वर्षीय दिव्यांग धर्मराज भारसाखरे यांनी ग्रामपंचायतीकडून अपेक्षित लाभ मिळाले नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
धर्मराज यांची व्यथा ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भागीमारी ग्रामपंचायतीने गत तीन वर्षांत दिव्यांगांसाठी किती खर्च केला याची पडताळणी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. तसेच ग्रामपंचायतीमार्फत आजवर किती दिव्यांगांना मदत करण्यात आली याचाही सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले.
तत्पूर्वी कन्हान येथील नगरपरिषद सभागृहात सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व आपदा मित्र यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेण्यात आली. पारशिवनी तालुक्यातील आठ गावे पूरप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कन्हान भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोर्डा गणेशी येथील अंतरंग फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या राईस मिलची पाहणी केली. तसेच परिसरातील पाणंद रस्त्यांचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसीलदार सुरेश वाघचौरे, गटविकास अधिकारी सुभाष जाधव व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





