34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक बी.ए. अर्थशास्त्र : Data Science, AI आणि रोजगाराच्या नव्या संधींकडे नेणारा भविष्याभिमुख...

बी.ए. अर्थशास्त्र : Data Science, AI आणि रोजगाराच्या नव्या संधींकडे नेणारा भविष्याभिमुख अभ्यासक्रम

0
42

blank

नागपूर :रोजगाराच्या नव्या संधींकडे नेणारा भविष्याभिमुख बी.ए. अर्थशास्त्र अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. या नवीन अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया आरंभ झाली आहे.
अर्थशास्त्राचा अभ्यास का करावा?
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आणि जागतिकीकरणाच्या युगात विचारपूर्वक करिअर निवडणे फार आवश्यक आहे. १२ वी नंतर कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत जाणून घेणे फार आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपल्या आवडीनुसार करिअर निवडले तर तो आपल्या इच्छेनुसार कार्यक्षेत्र निवडू शकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागामध्ये सत्र २०२६-२७ पासून अर्थशास्त्रात रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्थशास्त्र हा केवळ एक शैक्षणिक विषय नसून समाज, शासन, उद्योग, वित्तीय व्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था समजून घेण्याचा प्रभावी आणि महत्वपूर्ण दृष्टिकोन आहे. महागाई, बेरोजगारी, गरिबी, असमानता यासारख्या समस्यांबरोबरच आर्थिक विकास, जागतिक व्यापार, करप्रणाली, सार्वजनिक धोरणे, वित्तीय बाजारपेठा, डिजिटल अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हवामान बदल आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांच्या केंद्रस्थानी अर्थशास्त्र आहे.
अर्थशास्त्राचा अभ्यास विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून देत नाही, तर जगाकडे वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित करण्यास प्रवृत्त करतो. समाजातील आर्थिक समस्या समजून घेणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि योग्य उपाय सुचविणे यासाठी अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आज समाजामध्ये अभ्यासपूर्ण विषय मांडण्याची आणि योग्य दिशा देणाऱ्या विश्लेषकांची कमतरता आहे.
*अर्थशास्त्र विद्यार्थ्यांना काय शिकवते?*
अर्थशास्त्र केवळ पैशांचा किंवा बाजारपेठेचा अभ्यास नसून व्यक्ती, उद्योग, शासन आणि समाज यांच्या मदतीने उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपल्या गरजा कशा पूर्ण करतात याचा शास्त्रीय अभ्यास आहे. अर्थशास्त्र विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करण्याची, त्यामागील कारणे समजून घेण्याची आणि समस्यांवर परिणामकारक उपाय शोधण्याची क्षमता विकसित करते. या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील आर्थिक बदल समजून घेण्यास सक्षम होतात.
अर्थशास्त्राच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात जसे –
*डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात अर्थशास्त्राचे वाढते महत्त्व*
आजच्या डिजिटल युगात समंक शास्त्र (Data Science), Artificial Intelligence (AI), Machine Learning आणि Big Data यांचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्याने वाढत आहे. उद्योग, वित्तीय संस्था, शासन, आरोग्य, शिक्षण आणि ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये दररोज प्रचंड प्रमाणात समंक निर्माण होत आहे. मात्र, केवळ समंक उपलब्ध असणे पुरेसे नाही; त्या समंकामागील आर्थिक, सामाजिक आणि मानवी वर्तनाशी संबंधित कारणे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच ठिकाणी अर्थशास्त्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
समंक आपल्याला “काय घडत आहे?” हे सांगतो, तर अर्थशास्त्र “ते का घडत आहे?” आणि “त्याचे परिणाम काय असतील?” याचे स्पष्टीकरण देतो. त्यामुळे आर्थिक निर्णय, बाजारपेठेतील बदल, ग्राहकांचे वर्तन, गुंतवणूक, रोजगार, महागाई आणि विकास यांचे सखोल विश्लेषण करण्यासाठी अर्थशास्त्राची आवश्यकता अधिक वाढली आहे.
आज अनेक अग्रगण्य कंपन्या, बँका, संशोधन संस्था आणि शासन यंत्रणा अशा व्यक्तींचा शोध घेत आहेत ज्यांच्याकडे अर्थशास्त्राचे ज्ञान आणि समंक विश्लेषणाची कौशल्ये या दोन्हींचा संयोग आहे. त्यामुळे अर्थशास्त्र आणि समंक विश्लेषक यांचे संयोजन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आकर्षक आणि भविष्याभिमुख करिअर संधी निर्माण करीत आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या समन्वयामुळे आर्थिक प्रवाहांचा अंदाज बांधणे, बाजारपेठेतील बदल आणि ग्राहकांच्या पसंतीचे विश्लेषण करणे, वित्तीय जोखमींचे मूल्यांकन करणे आणि सार्वजनिक धोरणांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करणे शक्य होते. तसेच उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात समंक-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळते. शाश्वत विकास, नैसर्गिक संसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि भविष्यातील आर्थिक नियोजनासाठीही अर्थशास्त्र व समंक शास्त्राचे एकत्रित ज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचा संयोग विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगार बाजारपेठेत अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवतो.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचा बी.ए. अर्थशास्त्र (AEDP / ऑनर्स / संशोधन) अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण का आहे?.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून सुरू करीत असलेला बी.ए. अर्थशास्त्र (AEDP / ऑनर्स / संशोधन) हा अभ्यासक्रम विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी एक अद्वितीय आणि भविष्याभिमुख शिक्षणासह योजगाराची संधी आहे. हा केवळ पारंपरिक पदवी अभ्यासक्रम नसून, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग-अनुभव, संशोधन आणि रोजगारक्षमतेचा समन्वय साधणारा अभ्यासक्रम आहे.
विदर्भातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई, दिल्ली किंवा इतर महानगरांमध्ये जावे लागते. परंतु आता नागपूरमध्येच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुषंगाने आधुनिक, संशोधनाभिमुख आणि उद्योग-संलग्न अर्थशास्त्र शिक्षण उपलब्ध होणार आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी स्थानिक स्तरावर उपलब्ध होईल.
या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या उद्दिष्टांनुसार तीन पर्याय उपलब्ध असतील—AEDP (Apprenticeship Embedded Degree Programme), Honours आणि Honours with Research. त्यामुळे या अभ्यासक्रमातून विद्यार्थी रोजगार, उच्च शिक्षण किंवा संशोधन यापैकी एकाची निवड करून प्रगती करू शकतील. हेच या अभ्यासक्रमाला इतर पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे बनवते.
*१. बी.ए. अर्थशास्त्र (AEDP)*
अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची अप्रेंटिसशिप म्हणजेच शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. या कालावधीत विद्यार्थ्यांना उद्योगातील कार्यपद्धती, व्यावसायिक वातावरण आणि प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळते. अनेक संस्थांकडून विद्यार्थ्यांना १२३०० पर्यंत विद्यावेतन (स्टायपेंड) देखील दिले जाईल. AEDP (Apprenticeship Embedded Degree Programme) हा आधुनिक शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा निर्माण करणारा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उद्योग, वित्तीय संस्था, संशोधन संस्था, बँका, लॉजिस्टिक्स क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि विविध शासकीय विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योगाला आवश्यक असलेली कौशल्ये विकसित होतात आणि त्यांना वास्तविक कामकाजाची ओळख पदवी पूर्ण होण्यापूर्वीच प्राप्त होते. शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाच्या (अप्रेंटिसशिप) माध्यमातून विद्यार्थ्यांचा उद्योग व संस्थांशी संपर्क वाढतो, व्यावसायिक नेटवर्क तयार होते आणि रोजगाराच्या संधी अधिक सुलभ होतात. शासनाच्या मदतीने या उद्योग संस्थांकडून अप्रेंटिसशिप कालावधीत १२३०० पर्यंत विद्यावेतन (स्टायपेंड) दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पदवी पूर्ण होताच विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक पात्रतेबरोबरच उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे त्यांची रोजगारक्षमता लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे AEDP हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना “शिकत असतानाच उद्योगाचा अनुभव” आणि “करिअरची लवकर सुरुवात” या दोन्ही संधी उपलब्ध करून देणारा एक प्रभावी आणि भविष्याभिमुख पर्याय ठरतो. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासोबत लगेच रोजगाराच्या संधी शोधायच्या आहेत, त्यांच्यासाठी AEDP हा सर्वोत्तम पर्याय आहे.
*२. बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स)*
बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स) हा चार वर्षांचा प्रगत पदवी अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयातील सखोल आणि विशेषीकृत ज्ञान प्रदान करतो. नियमित पदवी अभ्यासक्रमाच्या तुलनेत ऑनर्स अभ्यासक्रमामध्ये विषयाचा अधिक व्यापक आणि सखोल अभ्यास केला जातो. विद्यार्थ्यांना सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, विकास अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थमिती, वित्तीय प्रणाली आणि समकालीन आर्थिक प्रश्न यांसारख्या विषयांचे प्रगत ज्ञान प्राप्त होते.
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करण्याची क्षमता, तार्किक विचारशक्ती, समंक समजून घेण्याची कौशल्ये आणि आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित करतो. आधुनिक अर्थव्यवस्थेत निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली सांख्यिकीय आणि परिमाणात्मक कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त होतात. याशिवाय, समंक विश्लेषक, वित्तीय बाजारपेठा, सार्वजनिक धोरणे आणि जागतिक अर्थव्यवस्था यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना बदलत्या आर्थिक वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम बनवतो.
ऑनर्स पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. ते एम.ए. अर्थशास्त्र, उपयोजित अर्थशास्त्र, अर्थमिती, सार्वजनिक धोरण, समंक विश्लेष, एमबीए किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वाटचाल करू शकतात. तसेच UPSC, MPSC, RBI, NABARD, बँकिंग सेवा, आर्थिक व सांख्यिकी सेवा यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठीही आणि रोजगाराच्या दृष्टीने बँकिंग, वित्तीय सेवा, बाजार संशोधन, व्यवसाय विश्लेषण, आर्थिक सल्लागार सेवा,समंक विश्लेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्राकरिता हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरतो.
*३. बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स विथ रिसर्च)*
बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स विथ रिसर्च) हा अभ्यासक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे ज्यांना संशोधन, अध्यापन, धोरण विश्लेषण, विकास अध्ययन किंवा उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर घडवायचे आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान मिळण्याबरोबरच संशोधनाची प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रक्रिया अनुभवण्याची संधी मिळते.
चौथ्या वर्षात विद्यार्थ्यांना संशोधनपद्धती (Research Methodology), प्रगत अर्थमिती (Advanced Econometrics), समंक विश्लेषण, धोरण विश्लेषण आणि संशोधन लेखन यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना स्वतंत्र संशोधन प्रकल्प हाती घेऊन संशोधन प्रबंध (Dissertation) तयार करावा लागतो. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना समंक संकलन, क्षेत्रीय सर्वेक्षण, सांख्यिकीय विश्लेषण, निष्कर्ष मांडणी आणि अहवाल लेखन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या संशोधनाद्वारे समाज, अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक धोरणांशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करू शकतात. कृषी, रोजगार, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, वित्तीय समावेशन, डिजिटल अर्थव्यवस्था, हवामान बदल, शाश्वत विकास, लॉजिस्टिक्स, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि विदर्भाच्या आर्थिक विकासासारख्या विषयांवर संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. ऑनर्स विथ रिसर्च पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना संशोधन संस्था, थिंक टँक, सार्वजनिक धोरण संस्था, विकास संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना आणि विद्यापीठीय संशोधन प्रकल्पांमध्ये काम करण्याच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होतात. तसेच UGC च्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या दिशेने पुढे जाण्यासाठी मजबूत पाया उपलब्ध करून देतो.
आजच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत संशोधन, समंक विश्लेषण आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ऑनर्स विथ रिसर्च हा पर्याय विद्यार्थ्यांना केवळ रोजगारासाठी नव्हे तर ज्ञाननिर्मिती, संशोधन नेतृत्व आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधींसाठीही सक्षम बनवतो. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील संशोधक, धोरण विश्लेषक, प्राध्यापक, आर्थिक सल्लागार आणि विकास तज्ज्ञ म्हणून घडविण्याची क्षमता ठेवतो.
विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाची आवश्यकता
विदर्भ हा कृषीप्रधान प्रदेश असून येथे कृषी, ग्रामीण विकास, औद्योगिक वाढ, रोजगारनिर्मिती, लॉजिस्टिक्स, खनिज संसाधने, ऊर्जा क्षेत्र आणि मानवी विकास यांसारख्या अनेक आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची गरज आहे. या प्रदेशाच्या विकासासाठी स्थानिक समस्यांची जाण असलेले आणि त्यावर संशोधन व धोरणात्मक उपाय सुचवू शकणारे प्रशिक्षित अर्थशास्त्रज्ञ आवश्यक आहेत.
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ राष्ट्रीयच नव्हे तर विदर्भाच्या विकासाशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी देईल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक विकासासाठी योगदान देण्याची क्षमता विकसित होईल. प्रादेशिक विकासासाठी आर्थिक विश्लेषण आणि धोरणनिर्मिती महत्त्वाची मानली जाते.
*विदर्भाला होणारे फायदे*
या कार्यक्रमामुळे विदर्भातील आर्थिक, सामाजिक आणि विकासविषयक प्रश्नांवर स्थानिक स्तरावर संशोधन वाढेल. कृषी, ग्रामीण विकास, उद्योग, रोजगार, महिला सक्षमीकरण, वित्तीय समावेशन, लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि मानवी विकास यांसारख्या विषयांवर अभ्यास आणि धोरणात्मक सूचना उपलब्ध होतील.
स्थानिक उद्योग, बँका, स्वयंसेवी संस्था आणि शासन विभागांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणामुळे प्रदेशाच्या विकासासाठी आवश्यक असलेले मानवी भांडवल (Human Capital) निर्माण होईल. प्रादेशिक विकासामध्ये शिक्षण, कौशल्ये आणि संशोधन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा बी.ए. अर्थशास्त्र (AEDP / ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च) हा अभ्यासक्रम केवळ पदवी प्रदान करणारा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, उद्योग-अनुभव, संशोधन क्षमता आणि रोजगारक्षमतेने परिपूर्ण करणारा एक सर्वसमावेशक शैक्षणिक उपक्रम आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विकसित करण्यात आलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगार, उच्च शिक्षण, संशोधन आणि स्पर्धा परीक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये सक्षम बनविणारा आहे. विशेषतः विदर्भातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर गुणवत्तापूर्ण, उद्योगाभिमुख आणि संशोधनाधारित शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक अर्थव्यवस्था, डेटा विश्लेषण, सार्वजनिक धोरणे आणि विकास क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता, बी.ए. अर्थशास्त्र हा विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया ठरेल.
अधिक माहितीकरिता अर्थशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर किंवा विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेत स्थळावर संपर्क साधता येईल.

blank