एक्सक्लुझीव वृत्त-भाग ३
हिरकणी कक्ष निर्मिती राज्यव्यापी घोटाळा: 2026 मध्ये गोंदियात 2.28 कोटी निधीची लूट
खेमेंद्र कटरे/गोंदिया- जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात हिरकणी कक्ष निर्माण करण्याकरिता २.२८ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाकरिता महाटेंडर या शासकीय वेबसाइटच्या माध्यमातून ई निविदा न करता गोंदियाच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तयार करण्यात येत असलेल्या १८ हिरकणी कक्ष निर्मितीकरिता जेम पोर्टलवरून विविध साहित्य खरेदी केल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे एका कक्षाकरीता १२ लाख ६८ हजार रुपये किंमत ठरवलेली असतांना प्रत्यक्ष पाहणी दरम्यान मात्र ९० हजाराच्या जवळपासचे साहित्यच त्या हिरकणी कक्षात लावण्यात आल्याचे दिसून आले.
महाटेंडरवर ई निविदा न करता कोट्यवधी रुपयाच्या या बांधकामाचे कंत्राट कोटेशन पद्धतीने देण्यात आले. २०२५-२६ या वर्षाकरिता विशेष म्हणजे १८ हिरकणी कक्ष तयार करण्याकरिता अंदाजपत्रकीय किमंतीनुसार सुमारे २.२८ कोटी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला आहे, यामध्ये एका हिरकणी कक्षाकरिता सुमारे १२ लाख ६८ हजार रुपयाचा खर्च निर्धारित करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

तर गेल्या दोन वर्षापूर्वी २०२३-२४ या आर्थिक वर्षात याच विभागाने १२ हिरकणी कक्ष तयार करण्याकरीता ९५ लाख ४१ हजार रुपये खर्च केलेला आहे. यात एका हिरकणी कक्षावर सुमारे ७ लाख ९६ हजार रुपयाच्या जवळपास निधी खर्च करण्यात आलेला आहे. या अंतर्गत २०२३-२४ या वर्षात तयार केलेल्या हिरकणी कक्षाचा स्तनदा महिलांनी किती लाभ घेतल्याची पडताळणी केले असता, बहुतांश हिरकणी कक्ष कुलूप बंद दिसून आले. त्या कक्षाकरीता नेमलेल्या महिला कर्मचारीचे काय यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून आढावा घेतले असता कुठल्याही विभागाकडे याची नोंद नसून हे कक्ष आजही कुलूपबंदच असल्याचे दिसून येत आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने नियोजन विभागाला सादर केलेल्या प्रस्तावातील वस्तूंच्या किंमती बघितल्यास यात प्रचंड कमिशनखोरी झाल्याचे नाकारता येत नाही. १२.६८ लाख किमतीच्या हिरकणी कक्षात अंदाजे जेमतेम ८० हजार ते ९० हजार किंमतीचे साहित्य परभणी येथील पुरवठादार श्री साई समर्थ यांनी पुरविल्याचे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान आढळून आले आहे. अंदाजपत्रकीय किंमत व प्रत्यक्ष साहित्याची किंमत बघितल्यास २ कोटीच्यावर शासकीय निधीचा गैरव्यवहाार झाल्याचे स्पष्ट होते.
प्रस्तावातील वरील किंमती हया अवाजवी असून प्रत्यक्षात जेम पोर्टलवरुन खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंच्या किंमतीत प्रचंड तपावत असल्याची शंका आहे. यावरुन या प्रकरणात कोट्यावधी रुपयाचा अपहार संगनमताने झाल्याचे दिसून येत असल्याने महिला व बाल विकास विभाग १८ हिरकणी कक्षाची मोका तपासणी करुन किमती निश्चित करून पुरवठादाराकडून वसुली करणार काय याकडे लक्ष लागले आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात १८ हिरकणी कक्षापैकी ३-४ ठिकाणी जागा अद्यापही निश्चित नसल्याचे दिसून आले. देवरी, तिरोडा यासह काही ठिकाणी ६.२५ लक्ष रुपये किंमतीची कॅबीनेट रूम दिसून आली नाही, असे कक्ष कार्यालयाच्या इमारतीतील कक्षात साहित्य घालून तयार करण्यात आल्याचे दिसून आले. तर गोंदिया पंचायत समितीने हिरकणी कक्षाची मागणी केलेली नसतानाही त्याठिकाणी हिरकणी कक्ष मंजुर केल्याचे संबंधित अधिकारी यांनाच माहित नसल्याचे दिसून आले. महिला बाल विकास विभागाने कोणत्या आधारे पुरवठादारास निधी वितरीत केला हे कळेनासे झाले आहे.
बाॅक्स
विभागाकडून माहितीची लपवा लपवी
महिला व बालविकास विभागाच्यावतीने संबधित हिरकणी कक्ष बांधकाम विषयी झालेला खर्च व साहित्य पुरवठ्याबाबतची माहिती लपवित असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते यासह अनेकांनी सदर माहिती मागितली असता ती माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यावरुन सदर विभागाने हिरकणी कक्ष निर्मितीकरीता पुरवठादारासोबत केलेल्या करारात नक्कीच घोळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

वर्कआर्डरनुसारच साहित्य पुरवठा
गोंदिया जिल्ह्यात १८ हिरकणी कक्ष निर्मितीकरिता निवडलेल्या परभणी येथील कंत्राटदार श्री स्वामी समर्थ मल्टी सर्विस कंपनीच्या व्यवस्थापकांना हिकरणी कक्षातील साहित्य पुरवठा व निर्मिती संदर्भात भ्रमणध्वनीवर विचारणा केले असता आम्ही अंदाजपत्रकानुसार नव्हे तर वर्कआर्डरनुसार साहित्य पुरवठा केला असून पुढील ३ वर्ष देखभाल दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले.
अर्धा तासातच निविदा प्रकिया पूर्ण
गोंदिया जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने हिरकणी कक्ष निर्मितीकरीता जेम पोर्टलवरुन ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता निविदा आमंत्रित करण्यात आली होती.त्यानंतर अवघ्या अर्धा तासात त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता बंद करण्यात आली.अवघ्या अर्धा तासातच ही निविदा प्रकिया बंद करुन अधिक स्पर्धेकांना सहभागी होण्यापासून थांबविण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.ही निविदा आमंत्रित करतांना साहित्यामध्ये मेडीकल वेस्टेज बॅग,एन्टीसेप्टिक लिक्विडचा समावेश आहे.तर जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयात सादर केलेल्या पत्रात मात्र वेगळेच नावे देण्यात आलेली आहेत.
- अस्वच्छता व अपुरी सुविधा: उपलब्ध असलेल्या कक्षांमध्ये पिण्याचे पाणी, पंखा, वीज, बसण्यासाठी योग्य जागा किंवा बाळासाठी पाळणा यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असतो。
- जागरूकतेचा अभाव: कक्षाची माहिती देणारे फलक नसल्याने महिलांना हे कक्ष शोधण्यात त्रास होतो。




