गोंदिया:– मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचीही तमा न बाळगता गोंदिया शहरातील ‘संडे सायकलिंग ग्रुप’च्या सायकलवीरांनी आज सकाळी पंढरपूर वारीला प्रस्थान केले. ओल्या रस्त्यांवर, अंगावर शिंतोडे उडवत हे चार वीर गोंदियाहून विठुरायाच्या दर्शनासाठी आणि जिल्ह्याच्या भल्यासाठी निघाले आहेत. नगराध्यक्ष सचिन शेंडे, कारगिल युद्धात एक पाय गमावलेले माजी सैनिक उदयभान निर्माणजी, घनश्याम उइके आणि मनोज बिसेन अशी या सायकलवारीतील वीरांची नावे आहेत. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या शेतात धानाचे भरघोस पीक यावे यासाठी विठुरायाच्या चरणी साकडे घालणे हा या वारीचा मुख्य उद्देश आहे. सकाळपासूनच पाऊस सुरू असतानाही हे सायकलस्वार डगमगले नाहीत. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी गोंदिया शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांसमोर नतमस्तक होऊन त्यांनी या वारीचा शुभारंभ केला. रवाना होताना जयस्तंभ चौक आणि शहरातील मार्गावर गोंदियातील नागरकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. फुलांचा वर्षाव, ‘जय विठोबा’, ‘ज्ञानबा तुकाराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. ओले होऊनही लोकांनी या सायकलवीरांना निरोप दिला. या वारीतील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे कारगिल योद्धा उदयभान निर्माणजी यांचा सहभाग. 1999 च्या कारगिल युद्धात एक पाय गमावल्यानंतरही देशभक्ती आणि जिद्दीने ते पंढरीची वाट धरत आहेत. त्यांची जिद्द पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले. नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी सांगितले, “गोंदिया-भंडारा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी सुखी व्हावा, पिकांना भाव मिळावा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही विठुरायाकडे प्रार्थना करणार आहोत. यासोबत ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा, देश वाचवा’ हा पर्यावरणपूरक संदेशही आम्ही वाटेत प्रत्येक गावात देणार आहोत.” गोंदिया ते पंढरपूर हा सुमारे 800 किमीचा खडतर प्रवास हे सायकलस्वार पुढील 4 ते 5 दिवसांत पूर्ण करणार आहेत. पावसात, ऊन-वाऱ्यात रात्रंदिवस प्रवास करत ते महाराष्ट्राची वारी परंपरा जपणार आहेत. आरोग्य, पर्यावरण आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम या वारीतून दिसून येत आहे. एक लोकप्रतिनिधी आणि एक कारगिल वीर जेव्हा समाजासाठी, जिल्ह्याच्या भल्यासाठी एकत्र येऊन पंढरीची वाट धरतात, तेव्हा ती वारी केवळ धार्मिक न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरते. पंढरपूरला पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन हे सर्वजण गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या या धाडसी आणि सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.




