
युवकांच्या स्वप्नांना भरारी देणारा पिंडकेपार ग्रामपंचायतीचा उपक्रम
गोंदिया- ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देत युवक-युवतींच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी पिंडकेपार ग्रामपंचायतीने लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत वाचनालय सुरू करून आदर्श उपक्रम राबविला आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून गावातील युवक-युवती आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तयारी करत आहेत.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल हिरदीलाल पटले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगिता सहारे होत्या. यावेळी उपसरपंच भरतराम घासले, ग्रामपंचायत अधिकारी रीना राऊत, सदस्य चंद्रकिशोर पटले, मंगला पटले, रेखा रहांगडाले, कला चौधरी, रूपा लटये, ग्रामपंचायत कर्मचारी राजकुमार साखरे, प्रशांत साखरे, राजेश चुलपार तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामस्थ आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंडकेपार गावात अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने युवक-युवतींना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरेगाव येथे जावे लागत होते. गावात वाचनालय सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र विविध प्रशासकीय प्रक्रियांमुळे या उपक्रमाला विलंब होत होता.
युवकांच्या गरजा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेत लोकसहभागातून जुन्या ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण केले. रंगरंगोटी व दुरुस्ती करून इमारतीला नवसंजीवनी देण्यात आली आणि त्यामध्ये अध्यापन कक्ष व वाचनालय सुरू करण्यात आले. याच इमारतीतील दुसऱ्या खोलीत महिला बचत गटांसाठी ग्रामसंघ कार्यालयाचीही स्थापना करण्यात आली आहे.
या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून न राहता स्थानिक ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारण्यात आला आहे.
जि.प. शाळेच्या माजी विद्यार्थ्याची अनोखी भेट
ग्रामपंचायतीने जुन्या इमारतीची दुरुस्ती करून वाचनालयासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची कमतरता होती. ही बाब लक्षात घेऊन पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल हिरदीलाल पटले यांनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके भेट देत वाचनालयाला मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले आहे





