38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ सारस पक्षी संवर्धन व विषमुक्त शेती विषयक कार्यशाळा उत्साहात

सारस पक्षी संवर्धन व विषमुक्त शेती विषयक कार्यशाळा उत्साहात

0
22

blank

गोंदिया–जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व गोंदिया, सेवा संस्था (SEWA), गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने “सारस पक्षी संवर्धन व विषमुक्त शेती” या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नवीन डीपीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे करण्यात आले. सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते, शेतकरी, कृषी अधिकारी व कर्मचारी, कृषी मित्र, स्वयंसेवी सारस मित्र यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्यांची सद्यस्थिती, त्यांच्या अधिवासांचे संरक्षण, प्रजनन क्षेत्रांचे संवर्धन तसेच विषमुक्त आणि जैवविविधतेला पूरक शेती पद्धतींचा प्रसार हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. सारस पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि समुदायाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमात सेवा संस्थेचे अध्यक्ष  सावन बहेकार यांनी सारस पक्ष्यांची सद्यस्थिती, गोंदिया जिल्ह्यातील अधिवासांचा आढावा, संवर्धनासमोरील विविध आव्हाने आणि समुदाय आधारित संवर्धनाची आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकरी आणि ग्रामस्तरावरील लोकसहभागाशिवाय सारस संवर्धनाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत, असे नमूद करत त्यांनी विषमुक्त शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया निलेश कानवडे यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कृषी व्यवस्थेमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी आवाहन केले की, पर्यावरणास हानीकारक, जैवविविधतेस धोका निर्माण करणारी तसेच शासनामार्फत बंदी घालण्यात आलेली रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व इतर रसायने शेतकऱ्यांना विक्री करू नयेत. अशा रसायनांच्या वापरामुळे मातीचे आरोग्य खालावते, जलस्रोत दूषित होतात, उपयुक्त कीटक आणि पक्ष्यांवर विपरीत परिणाम होतो तसेच पर्यावरणीय संतुलन बिघडते. विशेषतः सारस पक्ष्यासारख्या जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रजातींच्या अधिवासावर अशा रसायनांचा गंभीर परिणाम होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केवळ विक्रेते म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणूनही कार्य करावे, असे सांगून त्यांनी शिफारशीनुसार आणि गरजेनुसार कृषी निविष्ठांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. जैविक खते, जैविक कीडनियंत्रण साधने, सेंद्रिय निविष्ठा आणि पर्यावरणपूरक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून विषमुक्त शेतीला चालना देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. शेतकरी, कृषी विभाग आणि कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या समन्वित प्रयत्नांतूनच शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन आणि सारस पक्षी संरक्षणाची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
WWF-India चे प्रतिनिधी रोशन राठोड यांनी शाश्वत व सारस-मैत्रीपूर्ण भातशेती पद्धती, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM), आर्थिक नुकसानीची मर्यादा (ETL), उपयुक्त कीटकांची ओळख, सुरक्षित कीटकनाशक वापर, मृदा परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन आणि मृदा आरोग्य संवर्धन यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे पर्यावरण, जैवविविधता आणि सारस पक्ष्यांच्या अधिवासावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी कृषी शास्त्रज्ञ राजा चौहान यांनी शाश्वत शेती पद्धतींवर मार्गदर्शन केले. त्यांनी मृदा आरोग्य संवर्धन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा संतुलित वापर, उत्पादन खर्चात बचत तसेच पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केल्यास शेती उत्पादनक्षमतेसह जैवविविधतेचे संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण साध्य होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.कार्यशाळेत सारस पक्षी संवर्धनासाठी शेतपातळीवरील आणि शेताबाहेरील विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जैविक निविष्ठांचा वापर वाढविणे, पर्यावरणपूरक कृषी उत्पादने स्थानिक बाजारात उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन पुरविणे, कीड व रोग व्यवस्थापनाबाबत माहितीचा प्रसार करणे तसेच जैवविविधता संवर्धनाविषयी व्यापक जनजागृती करणे यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी सारस-मैत्रीपूर्ण भात उत्पादनासाठी शेतकरी गटांची निर्मिती, उत्पादनांचे ब्रँडिंग, बाजारपेठ जोडणी आणि शाश्वत कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनाही मांडण्यात आल्या. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव, वाढीव उत्पन्न आणि दीर्घकालीन उपजीविका सुरक्षितता प्राप्त होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  संतोष सतदिवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी विभाग यांनी केले. त्यांनी कार्यशाळेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे तसेच सारस पक्षी संवर्धन आणि विषमुक्त शेती यांच्यातील परस्परसंबंध याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजनबद्ध व सूत्रसंचालन करून त्यांनी कार्यशाळेची सांगता केली.
“नांदतील सारस ज्या शेतात, ती शेते राहतील नेहमी खुशहाल” हा संदेश कार्यशाळेद्वारे प्रभावीपणे देण्यात आला. सारस पक्ष्यांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत कृषी विकास यांचा समन्वय साधून पर्यावरणपूरक कृषी व्यवस्थेची उभारणी करण्याची आवश्यकता उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गोंदिया, सेवा संस्था गोंदियाचे डीलेश कुसराम, सुशील बहेकार, प्रतीक लाडेकर,भास्कर कापसे, राकेश चुटे तसेच सहभागी शेतकरी, स्वयंसेवक आणि सर्व संबंधित विभागांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही सारस पक्षी संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि विषमुक्त शेतीचा प्रसार करण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

blank