लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवेचा विस्तार
दीर्घकाळापासून गुडघ्याच्या सांध्यातील गंभीर झीज आणि असह्य वेदनांनी त्रस्त असलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अनेक वर्षांपासून चालणे, उभे राहणे, जिने चढणे तसेच दैनंदिन कामकाज करणेही तिच्यासाठी कठीण बनले होते. वाढत्या वेदनांमुळे तिचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनही प्रभावित झाले होते.
गावाकडील अनेक नागरिकांप्रमाणेच प्रगत वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते, अशी तिची धारणा होती. अशा उपचारांसाठी होणारा प्रचंड खर्च, प्रवासातील अडचणी आणि अनिश्चितता यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेणे कठीण झाले होते. मात्र लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सविस्तर वैद्यकीय तपासणी करून टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची शिफारस केली.
रुग्णालयाने समाजाभिमुख आरोग्यसेवेची भूमिका जपत ही संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असलेला सर्वात मोठा अडथळा दूर झाला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णेवर आवश्यक पुनर्वसन उपचारही करण्यात आले.
विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच संबंधित रुग्ण स्वतःच्या पायांवर उभी राहून चालू लागली. अनेक वर्षांच्या वेदनांनंतर पुन्हा आत्मविश्वासाने चालण्याचा अनुभव तिच्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरला. सध्या तिच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली असून ती अत्यल्प वेदनांसह दैनंदिन कामे करू शकत आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यात अशा प्रकारची अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे होणे हे आरोग्यसेवेच्या दृष्टीने मोठे यश मानले जात आहे. यामुळे भविष्यात विशेष उपचारांसाठी नागपूर, हैदराबाद, पुणे किंवा मुंबईसारख्या महानगरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून स्थानिक स्तरावरच दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय सातत्याने आपल्या वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि अत्याधुनिक उपकरणांची क्षमता वाढवत आहे. गडचिरोलीतील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रुग्णालय विविध विशेष उपचार सेवा सुरू करत आहे.पहिली यशस्वी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही केवळ एका रुग्णाच्या नवजीवनाची कहाणी नसून गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या प्रगतीचा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरत आहे. यामुळे ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना आधुनिक वैद्यकीय उपचारांची नवी आशा मिळाली आहे.





