38.2 C
Gondiā
Thursday, June 11, 2026
Home रोजगार/व्यापार कमी खर्चात कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी

कमी खर्चात कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी

0
13

blank

वाशिम, दि.११ जुन : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मंगरूळपीर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून इच्छुक विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांमध्ये प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य, शासकीय आयटीआय मंगरूळपीर एस. व्ही. नखाते यांनी केले आहे.
शासकीय आयटीआय ही अत्यंत कमी खर्चात दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण देणारी आणि रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी यशस्वी शासकीय योजना आहे. अनेक दशकांपासून हजारो युवक-युवतींना तांत्रिक कौशल्ये प्रदान करून त्यांना उद्योग, व्यवसाय आणि सेवाक्षेत्रात यशस्वीपणे स्थिर होण्यास मदत केली आहे.प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी आधार कार्डवरील माहितीनुसार admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह आयटीआयमध्ये उपस्थित राहून अर्ज निश्चित (कन्फर्म) करावा, असे संस्थेचे प्रवेश प्रमुख आर. पी. सोनोने यांनी सांगितले.
यावर्षी संस्थेमध्ये अभियांत्रिकी तसेच बिगर अभियांत्रिकी व्यवसायांसाठी एकूण २५६ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्याधारित व्यवसायांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी माहितीपत्रके संस्थेत ठेवण्यात आली आहेत. विजतंत्री, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, मोटार मेकॅनिक यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित व्यवसायांना सध्या मोठी मागणी असून इतरही अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांना योग्य व्यवसाय निवडता यावा आणि प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेत दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विविध व्यवसायांची माहिती, रोजगाराच्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जात असल्याचे प्राचार्य एस. व्ही. नखाते यांनी सांगितले.तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.