
तिरोडा ( जि. गोंदिया),दि.११ : तालुक्यातील बोदलकसा जलाशय परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या नऊ युवकांच्या गटातील दोन युवक जलाशयात बुडाल्याची घटना बुधवारी (दि.११) सायंकाळी घडली होती.मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे दोघांचा शोध लागला नव्हता,आज गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून पुन्हा शोधमोहीम सुरु केल्यानंतर दोन्ही युवकांचे मृतदेह स्थानिक मच्छीमार व आपत्ती व्यवस्थापन चमुच्या पथकाला मिळाले असून मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे या दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढून तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरबसपुरा येथील काही युवक बोदलकसा जलाशय परिसरात फिरण्यासाठी गेले होते.यामध्ये अक्षय नरेंद्र बिसेन, राकेश राधेशाम लाडे, निखिल इंदल पटले, लक्की संजय रहांगडाले, प्रलय राधेशाम पारधी, मनीष रमेश कोकूडे, अविनाश श्रावण टेकाम, मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे यांचा समावेश होता.यापैकी मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे हे दोघे जलाशयाच्या पाण्यात बुडाले.दोन्ही युवकांच्या अकाली मृत्यूमुळे बरबसपुरा गावात शोककळा पसरली आहे.




