42 C
Gondiā
Friday, June 12, 2026
Home मराठवाडा/खान्देश लातूर जिल्ह्यात रोजगार व असंघटित उद्योगांच्या सर्वेक्षणाला सुरुवात

लातूर जिल्ह्यात रोजगार व असंघटित उद्योगांच्या सर्वेक्षणाला सुरुवात

0
6

blank

;नागरिकांनी खरी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन
लातूर, दि. १२ : राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारी प्राप्त होण्याच्या दृष्टीने सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय आणि महाराष्ट्र इन्स्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) यांच्या सहकार्याने अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत लातूर जिल्ह्यात दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणे राबविण्यात येणार आहेत. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (पीएलएफएस) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसयुएसइ) अशी या सर्वेक्षणांची नावे असून, ती जून-२०२६ ते डिसेंबर-२०२६ या कालावधीत पूर्ण केली जातील.
या दोन्ही सर्वेक्षणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण आर्थिक आणि सामाजिक आकडेवारी संकलित केली जाणार आहे. पीएलएफएस सर्वेक्षण याअंतर्गत रोजगार, बेरोजगारीचे प्रमाण, महिलांचा कामगारांमधील सहभाग, स्वयंरोजगार आणि असंघटित रोजगार याबाबत अद्ययावत व विश्वासार्ह आकडेवारी गोळा केली जाईल.
एएसयुएसइ सर्वेक्षणामधून उत्पादन, व्यापार आणि सेवा या असंघटित क्षेत्रांतील (बांधकाम क्षेत्र वगळून) उद्यम आस्थापनांची माहिती घेतली जाईल. यामध्ये रोजगाराचा प्रकार (पगारी/स्वयंरोजगारी), कार्यरत कामगारांची संख्या, प्रती कामगार व प्रती उद्यम स्थूल मूल्यवृद्धी, उत्पादकता आणि वेतन अशा महत्त्वाच्या आर्थिक निर्देशकांचा समावेश असेल. या संकलित माहितीच्या आधारे राज्य आणि जिल्ह्याच्या उत्पन्नाचा अचूक अंदाज बांधणे आणि जिल्हास्तरीय विकास निर्देशांकांचे मापन करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाने ‘इप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी संस्थेची निवड केली आहे. या संस्थेचे अन्वेषक आणि पर्यवेक्षक निवडक कुटुंबांना, उद्योगांना आणि व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेट देतील व विहित प्रपत्रात मुलाखतीद्वारे माहिती गोळा करतील. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती किंवा उद्योग प्रमुखांशी भेट होणे आवश्यक असल्याने, या कर्मचाऱ्यांना रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या सर्वेक्षणाद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीचा दर्जा पूर्णपणे नागरिक आणि व्यावसायिकांनी दिलेल्या सहकार्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबाची आणि व्यवसायाची अद्ययावत व अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. तसेच, कोणतीही शंका किंवा संकोच न बाळगता अन्वेषकांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी माहिती देऊन राष्ट्रीय व जिल्हास्तरीय कार्यात हातभार लावावा, अशी विनंती जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आणि जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त उमाकांत हत्ते यांनी केली आहे.