26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता सुगंधित तंबाखूच्या अवैध साठेबाजीवर पोलिसांची धाड,१५.४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

सुगंधित तंबाखूच्या अवैध साठेबाजीवर पोलिसांची धाड,१५.४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
40

गोंदिया : रावनवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ढीमरटोला परिसरातील एका शेतातील घरात सुरू असलेल्या सुगंधित तंबाखूच्या अवैध साठा आणि पॅकिंग केंद्रावर रावणवाडी पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १५ लाख ४८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, गडचिरोली जिल्ह्यातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना १२ जूनची आहे.सविस्तर असे की, रावणवाडी पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे ढीमरटोला येथील एका शेतातील घरातून सुगंधित तंबाखूची साठवणूक करून ती चारचाकी वाहनाद्वारे बाहेर पाठवली जात आहे. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने सूत्रे हलवली. पोलीस पथकाने रात्रभर त्या घराभोवती कडक पाळत ठेवली होती. दरम्यान (ता. १३) पहाटेच्या सुमारास पंचांसमक्ष घरावर धाड टाकली. या कारवाईत मयुर मनोहर वाकडे (रा. वघाडा, ता. आरमोरी, जि. गडचिरोली) याला रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुगंधित तंबाखूचे विविध पोते, पॅकिंग मशिनरी आणि चारचाकी वाहन जप्त केला आहे. याची एकूण १५ लाख ४८ हजार १०० रुपये एवढी आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात पोनि. वैभव पवार, सपोनि. शशिकिरण नावकार, पो. उप. नि. ओंकार धेंडे, गिरीष पांडे, शुशिल मलेवार, हितेश लांजेवार, माने, पवार यांनी केली.