
सालेकसा- उन्हाळ्याच्या दिवसांत निर्माण होणारी पाणीटंचाई आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने नगर पंचायत सालेकसा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नगर पंचायतला नव्याने प्राप्त झालेल्या पाणी टँकरचे लोकार्पण १० जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या पाणी टँकरमुळे शहरातील विविध वार्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अधिक प्रभावीपणे करता येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकार्पण कार्यक्रमास नगराध्यक्ष विजय सुदाम फुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सभापती विनोद मदनलाल मडावी, सभापती छन्नु भास्कर शिवणकर, सदस्य अतुल रेड्डीवार, रितेश लिल्हारे, राजू मेघराज जैन, महेंद्र पुसाम, रविंद्र चुटे तसेच नगर पंचायतचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून पाणी टँकरचे लोकार्पण करण्यात आले.
लोकार्पणानंतर नवीन पाणी टँकरद्वारे वार्ड क्रमांक ४ मध्ये तात्काळ पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले. अनेक भागांमध्ये वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढली असून काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत हा नवीन टँकर नागरिकांपर्यंत वेळेवर आणि नियमित पाणी पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारआहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगर पंचायत सालेकसा नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले. पिण्याचे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणेही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळणार असून पाणी समस्येचा सामना करीत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.




