40.6 C
Gondiā
Monday, June 15, 2026
Home विदर्भ तुमसर नगरपरिषदेच्या भोजन कंत्राट प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी

तुमसर नगरपरिषदेच्या भोजन कंत्राट प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी

0
16

blank

कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे प्रकरणाला नवे वळण
तुमसर, १५ जून- तुमसर नगरपरिषद निवडणूक २०२५ दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भोजन कंत्राटात कथित आर्थिक गैरव्यवहार आणि पदाचा गैरवापर झाल्याच्या आरोपांप्रकरणी महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. तुमसर पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुढील कायदेशीर कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखा, भंडारा यांच्याकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर दाखल केलेल्या तक्रारीत नगरपरिषद निवडणुकीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या भोजनाचे कंत्राट देताना कायदेशीर निविदा प्रक्रियेचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.
तक्रारदाराने नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील लिपिक नितेश भवसागर यांनी लोकसेवक असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक हितसंबंध जपल्याचा आरोप केला आहे. तसेच या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधितांवर विविध कायदेशीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
दरम्यान, तुमसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित मेश्राम यांनी याच विषयावर स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार दिली असून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात कोणताही दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा नोंद झालेला नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच या तक्रारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
प्रकरणाचा संबंध नगरपालिकेच्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांशी आणि कथित अनियमिततेशी असल्याने सखोल चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी अहवाल आर्थिक गुन्हे शाखा, भंडारा यांच्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.या घडामोडीनंतर नगरपरिषदेच्या भोजन कंत्राट प्रकरणातील वस्तुस्थिती काय समोर येते आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत कोणते निष्कर्ष निघतात, याकडे संपूर्ण तुमसर तालुक्याचे लक्ष लागले आहे.