
; ८२ हजारांहून अधिक बालकांना मिळणार सुरक्षा कवच-डॉ.मंगेश गोंदावले, जिल्हाधिकारी
मोहीम कालावधी दि.१६ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६
गोंदिया: बालकांमधील अतिसाराचे प्रमाण रोखण्यासाठी आणि बालमृत्यू दरात घट करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १६ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया’ (Intensified Diarrhea Control Fortnight) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील एकूण ८२,८२४ बालकांना ओआरएस (ORS) आणि झिंकच्या गोळ्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली आहे..
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये सध्या ९१,८५८ ओआरएस पाकिटे,१,६०,८०० झिंकच्या गोळ्या आणि ३,८८७ झिंक सिरपची उपलब्धता करून देण्यात आली आहे. आशा सेविका यांच्या मार्फत प्रत्येक घरात जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी केली जाईल व आवश्यकतेनुसार औषधोपचार पुरवला जाईल.
मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये आणि नियोजन-
आशा सेविकांचे मोठे योगदान: जिल्ह्यातील १,२९२ कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या मदतीने ही मोहीम प्रत्यक्ष गावपातळीवर राबवली जाणार आहे.मोहिमे दरम्यान ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रशिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे
शाळा व अंगणवाड्यांचे सर्वेक्षण: मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १,८७८ अंगणवाड्या आणि १,१६५ जिल्हा परिषद शाळांमधील बालकांचे सविस्तर सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
कुटुंबांपर्यंत पोहोचणार आरोग्य यंत्रणा: एकूण १३,२९,०५३ लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या ६६,४३८ कुटुंबांपर्यंत आशा सेविका आणि आरोग्य यंत्रणा या मोहिमेच्या माध्यमातून पोहोचणार आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन-
आरोग्य प्रशासनातसर्फे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी (DRCHO) डॉ. रोशन राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या 0 ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी.पावसाळ्याच्या दिवसांत बालकांमध्ये अतिसाराचा (डायरिया) धोका वाढतो, त्यामुळे आशा सेविका घरी आल्यास त्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे आणि बालकांना सुरक्षित प्रदान करावी.




