
आमगाव :नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार करून माली येथील सुशिक्षित तरुण राजेंद्र रामराज शेंडे यांनी शेळीपालन व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोटा जातीच्या शेळ्या व बोकडांच्या संगोपनातून त्यांनी आधुनिक गोट फार्म उभारला असून, आज त्यांना या व्यवसायातून दरवर्षी चांगला आर्थिक लाभ मिळत आहे.
राजेंद्र शेंडे यांनी बी.ए. तसेच आयटीआय (ऑटोमोबाईल) शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर येथे ऑटोमोबाईल क्षेत्रात काम केले. कोरोनाच्या काळात परिस्थिती बदलल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सखोल अभ्यास, नियोजनबद्ध तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शेळीपालन व्यवसायाची निवड केली.सुरुवातीला त्यांनी कोटा, सिरोही, सोजत, बारबेरी तसेच देशी जातीच्या शेळ्यांचे संगोपन केले. अनुभव आणि अभ्यासातून त्यांना असे लक्षात आले की कोटा जातीच्या शेळ्या अधिक उत्पादनक्षम असून त्यांची वाढ जलद गतीने होते. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे कोटा जातीच्या शेळ्यांच्या संगोपन व व्यापारावर लक्ष केंद्रित केले.
व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात अनेकांनी त्यांना राजस्थानातील शेळ्या महाराष्ट्राच्या हवामानात टिकणार नाहीत तसेच हा व्यवसाय फायदेशीर ठरणार नाही, असा सल्ला दिला. मात्र राजेंद्र शेंडे यांनी आपल्या अनुभवाने आणि यशाने या सर्व समजुती चुकीच्या ठरवल्या. त्यांच्या मते, कोटा जातीच्या शेळ्या महाराष्ट्रातील उष्णता, पावसाळा आणि थंडी या तिन्ही ऋतूंमध्ये सहजपणे जुळवून घेतात.
उत्कृष्ट पशुपालक म्हणून गौरव
राजेंद्र शेंडे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांचा उत्कृष्ट पशुपालक म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच २०२५ मध्ये आयोजित तालुका पशु-पक्षी प्रदर्शनात उत्कृष्ट बोकड संगोपनासाठी प्रथम क्रमांक मिळाला. याशिवाय २०२६ च्या पशु-पक्षी प्रदर्शनात उत्कृष्ट शेळी-बोकड संगोपन गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
कोटा जातीची वैशिष्ट्ये
कोटा जातीची शेळी साधारणपणे एका वेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. या जातीची वाढ इतर जातींच्या तुलनेत सुमारे ५० टक्के अधिक वेगाने होते. या जातीचे बोकड अवघ्या पाच महिन्यांत चांगले वजन प्राप्त करतात. त्यामुळे बकरी ईदच्या काळात त्यांना मोठी मागणी असते.
अलीकडेच राजेंद्र शेंडे यांनी सुमारे ५० बोकडांची विक्री केली. या जातीच्या शेळ्यांना सामान्य हिरवा व वाळलेला चारा पुरेसा ठरतो, त्यामुळे संगोपनाचा खर्चही तुलनेने कमी राहतो.
युवकांना देत आहेत मार्गदर्शन
राजेंद्र शेंडे केवळ स्वतःचा व्यवसाय करत नाहीत, तर ग्रामीण भागातील युवकांना शेळीपालनाचे प्रशिक्षण व मार्गदर्शनही देत आहेत. त्यांचे मत आहे की योग्य माहिती, तांत्रिक ज्ञान आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवसाय केल्यास तोट्याची शक्यता अत्यंत कमी राहते.
रोजगाराचे नवे साधन
राजेंद्र शेंडे यांच्या मते, सध्या राजस्थानातून मोठ्या प्रमाणात बोकड महाराष्ट्रात आणले जातात. जर महाराष्ट्रातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय स्वीकारला, तर ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक पातळीवर दर्जेदार बोकड उपलब्ध होतील.
भविष्यात कोटा जातीच्या शेळ्या व बोकड स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देणे आणि युवकांना आत्मनिर्भर बनविणे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.अभ्यास, मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या बळावर ग्रामीण युवकही मोठ्या प्रमाणात यशस्वी उद्योजक बनू शकतात. राजेंद्र रामराज शेंडे यांचे यश हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.




