32.6 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू;दोन वर्षांची मादी बिबट जेरबंद

तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू;दोन वर्षांची मादी बिबट जेरबंद

0
49

अर्जुनी-मोर.-तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथे गुरुवारी सकाळी गावात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळविले. या घटनेमुळे काही काळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास गावातील शाळेच्या आवारात काही नागरिकांना बिबट दिसून आला. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट तेथून निसटला. काही वेळातच तो लांजेवार यांच्या घरात शिरल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत सर्व दरवाजे बंद करून स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली.
बिबट गावात शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. गर्दीचा फायदा घेत बिबट तेथून निसटून बोरकर यांच्या घराजवळील शौचालय परिसरात दिसून आला. याचवेळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम हाती घेण्यात आली.
त्यानंतर बिबट मेश्राम यांच्या घराजवळील एका पडक्या घराच्या परिसरात दिसून आला. वनविभागाने त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले; मात्र बिबट पुन्हा तेथून निसटला. त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी जाळे तसेच अन्य आवश्यक साहित्य परिसरात तैनात केले. दरम्यान, बिबट पुन्हा तेथून निसटून होमराज मेंढे यांच्या घराच्या दिशेने गेला. अखेर वनविभागाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश आले.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेली बिबट अंदाजे दोन वर्षांची मादी असून तिची प्रकृती चांगली आहे. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.
दरम्यान, बिबट पाहण्यासाठी पिंपळगाव-खांबीसह परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार कमलेश सोनटक्के हे आपल्या पथकासह घटनास्थळी तैनात होते.
या यशस्वी रेस्क्यू मोहिमेत नवेगावबांध वनपरिक्षेत्र अधिकारी मारबते, सहाय्यक वनसंरक्षक अविनाश मेश्राम, बाराभाटी बिटच्या चादेवार मॅडम, आरआरटी गोंदिया पथक, नवेगावबांध रेस्क्यू टीमचे सतीश शेदरे, अमोल चौबे, विक्रांत ब्राम्हणकर, अमित राऊत, राजेश ढोक तसेच पीआरटी पथकाचे सदस्य आणि बाराभाटी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोकडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.