गोंदिया,20 जून-राज्य राखीव पोलिस गट क्रमांक १, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स’ (टीओटी) सत्र क्रमांक १० मध्ये गोंदिया जिल्ह्यातील पोलिस अंमलदार राजू कोसरे यांनी उत्कृष्ट फायरिंग कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गोंदिया जिल्ह्याच्या पोलिस दलाचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे.८ ते १३ जून २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणात राज्यातील ३७ जिल्ह्यांतील ७ प्रशिक्षणासाठी बोलावले होते. या प्रशिक्षणात ११ पोलिस अधिकारी आणि ५१ पोलिस अंमलदार प्रशिक्षक सहभागी झाले होते. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात सी-६० पथक, सालेकसा येथे कार्यरत असलेल्या पोलिस अंमलदार राजू कोसरे यांनी अचूक निशाणेबाजी आणि उत्कृष्ट फायरिंग कौशल्याच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते करण्यात आला. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या बळावर मिळवलेले हे यश पोलिस दलातील इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.राजू कोसरे यांच्या यशाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे तसेच गोंदिया जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.गोंदिया जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करणारी ही कामगिरी युवकांसह पोलिस दलातील प्रत्येक सदस्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचा प्रत्यय राजू कोसरे यांच्या यशातून आला आहे.





