36.3 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

0
13

जिल्हाधिकारी यांनी केली पूरप्रवण भागांची पाहणी

गोंदिया, दि.22 : जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरु झाला असून जिल्ह्यातील पुरप्रवण भागात जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी रविवारी भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून जिल्हा प्रशासन पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सहायक अभियंता बाघ इटियाडोह प्रियम शुभम, कनिष्ठ अभियंता रामेश्वर कुंडलवाडे, संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी गोंदिया तालुक्यातील कोरणी घाट, रजेगाव, बिरसोला, कासा, काटी, पुजारीटोला या गावांना भेट देवून स्थानिक लोकांशी संवाद साधला तसेच मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने यावर्षी करण्यात आलेले पूर परिस्थितीचे नियोजन व भौगोलिक परिस्थिती पाहणी केली.

यावर्षी भारतीय हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. तरीही जिल्हाधिकारी यांनी पूरप्रवण गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली व पूर येण्याची कारणे तसेच पूर परिस्थिती दरम्यान शोध व बचाव करण्याकरीता प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून जाणून घेतली.वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान तसेच वेळेवर शासनाकडून तात्काळ मदत देण्याकरीता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादीबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली. तसेच जिल्हाधिकारी यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी  संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी यांचे नागरिकांनी आवाहन

आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. प्रशासन व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. आज रोजी जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही. परंतु धरण, जलाशय या ठिकाणी पाण्यात उतरू नये. तसेच सेल्फीचे मोह टाळावे व पाण्यात बोटिंग करताना लाइफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

पाण्याचा वापर जपून करा…

यावर्षी कमी पावसाचा अंदाज असल्यामुळे येत्या काळात शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावे तसेच हवामान खात्याकडून प्राप्त सूचनांच्या आधारे शेतीची कामे करावे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्षारोपण जास्तीत जास्त प्रमाणात करावे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या पाणीटंचाई व वाढत्या तापमानाला तोंड देणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.