27.6 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home विदर्भ खरीप हंगामापूर्वी बीज अंकुरण चाचणीचे खुर्शिपार येथे प्रात्यक्षिक

खरीप हंगामापूर्वी बीज अंकुरण चाचणीचे खुर्शिपार येथे प्रात्यक्षिक

0
4

आमगाव,दि.२४ः आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी आणि बीज अंकुरण चाचणी योग्य पद्धतीने कशी करावी, याबाबत आमगाव तालुक्यातील खुर्शिपार येथे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. हा उपक्रम मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय, हिराटोला यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आला.

चांगले बियाणे निवडणे, बियाण्यातील उगवणक्षमतेची माहिती मिळविणे, योग्य बियाणे दर ठरविणे तसेच पीक उत्पादन वाढविण्यासाठी बीज अंकुरण चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या उद्देशाने कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना बियाण्याची अंकुरण चाचणी करून प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी विद्यार्थिनी आचल ठाकरे, पल्लवी टिकरिया, चैत्राली ठाकरे, प्रगती टेंभरे, आणि खुशबू तागडे यांनी शेतकऱ्यांना बीज अंकुरण चाचणीची शास्त्रोक्त पद्धत, चाचणीची आवश्यकता व फायदे, विविध पिकांसाठी शिफारस केलेला बियाणे दर तसेच पेरणीपूर्व नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.

तसेच भात, सोयाबीन, तूर या पिकांच्या बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी, गोणपाट पद्धत, पेपर टॉवेल पद्धत याचेही प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बीज अंकुरण चाचणीविषयी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले.या प्रात्यक्षिकाचे आयोजन व मार्गदर्शन मृदा विज्ञान विषयतज्ज्ञ आर. आर. कोवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. सी. अवताडे, रावे कार्यक्रम प्रमुख के. आर. चौव्हाण सर तसेच कार्यक्रम अधिकारी मिस. भावना सिरसाम डॉ. विपिन ब्राम्हणकर सर अविनाश दमाहे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमास गावचे शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होत्या अनिल तुरकर, राजदीप (लक्की) राणे ,मुन्नालाल तुरकर, सेवकराम तुरकर, दीक्षा तुरकर, दिपाली भिमटे , बागडे ताई, मीना ताई ठाकूर ,बडीबाई राहगडले व ग्राम संघ खुर्शीपार येथील महिला यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील अनेक शेतकरी उपस्थित राहून बीज अंकुरण चाचणीचे महत्त्व जाणून घेतले आणि आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक माहिती प्राप्त केली.