अर्जुनी/मोर दि.24 : ग्रामविकासाला चालना देणाऱ्या आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तब्बल ३३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन विहिरगांव/बर्ड्या येथे पार पडले. या विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद गोंदिया अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या या विकासकामांमध्ये अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामासाठी २० लाख रुपये, स्मशानभूमी येथे दहन शेड व चबुतरा बांधकामासाठी १० लाख रुपये तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी भव्य प्रवेशद्वार उभारण्यासाठी ३ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. या कामांमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत.
गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींपासून ग्रामस्थांची सुटका होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास, शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीस तसेच नागरिकांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळणार असून गावाच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे.तसेच स्मशानभूमी परिसरात उभारण्यात येणारे दहन शेड व चबुतरा हे नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असून स्मशानभूमी परिसर अधिक सुस्थितीत आणि सुविधायुक्त होणार आहे.
जिल्हा परिषद शाळेसाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रवेशद्वारामुळे शाळेचे सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल तसेच शैक्षणिक वातावरण अधिक आकर्षक आणि प्रेरणादायी बनेल.
भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी ग्रामीण भागातील विकासकामे ही लोकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. गावातील रस्ते, मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक ठिकाणांची दुरुस्ती व विकास यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य कुंदा लोगडे, सरपंच विशाखा वालदे, उपसरपंच अतुल बडोले, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष ताराचंद बडोले, उपाध्यक्ष रामचंद्र डोये, पोलीस पाटील हनवंत बारसे, लक्ष्मी भातगिरणीचे संचालक चंद्रशेखर तरोणे, प्रिया बडोले, गीता तरोने, प्रेमलाल शिवणकर, मुकुंदा वालदे, नितीश जांभुळकर, हेमराज बडोले, हितेश बडोले, जितेंद्र शिवणकर, विश्वनाथ वालदे,सचिन गायधने, महेंद्र दोनोडे, विशाल राखडे, जैराम हातझाडे, मुख्याध्यापक जाधवजी, ग्रामसेवक बडोलेजी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





