धाराशिव,दि.२५ जून -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,धाराशिव,जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग तसेच यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर विविध जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संदेश देणाऱ्या या अभियानात विद्यार्थी,युवक,शिक्षक, अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभियानाला सुरुवात करण्यात आली.
अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषद कन्या प्रशाला,धाराशिव येथे आयोजित व्यसनमुक्ती शपथविधी कार्यक्रमाने झाला.या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांवदा म्हाडदाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले,यश मेडिकल फाउंडेशनचे डॉ. संदीप तांबारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.संदीप तांबारे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, त्यावरील उपाययोजना आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी आयुष्यभर व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.
यानंतर समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी कन्या प्रशाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत भव्य जनजागृती दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर्स,बॅनर्स आणि जनजागृतीपर फलक घेऊन सहभाग नोंदविला.
“नशामुक्त भारत – सशक्त भारत”, “नशामुक्त भारत – विकसित भारत” आणि “नशामुक्त धाराशिव – सशक्त धाराशिव” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे युवकांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सचिन कवले होते.प्रमुख उपस्थितीमध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिदानंद बागर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त परमेश्वर खुने,समाजकल्याण निरीक्षक अमोल कातगळे तसेच डॉ.संदीप तांबारे यांचा समावेश होता.





