34.7 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home विदर्भ अदानी पाॅवर लि.तिरोडा येथे वाहनचालकांकरीता रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

अदानी पाॅवर लि.तिरोडा येथे वाहनचालकांकरीता रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

0
12

तिरोडा,दि.२६ः रस्ता सुरक्षा वाढविणे व अपघात कसे टाळायचे या उद्देशाने अदानी पॉवर लिमिटेड, तिरोडाच्या वतीने आज(दि.२६) कंपनीच्या मटेरियल गेट येथे सर्व वाहनचालकांसाठी रोड सेफ्टी टूल बॉक्स टॉक (TBT) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या समन्वयाने पार पडला.

कार्यक्रमादरम्यान वाहनचालकांना सुरक्षित व जबाबदार वाहनचालनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वाहन चालविताना मद्य, गांजा किंवा कोणत्याही प्रकारच्या अमली अथवा प्रतिबंधित पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये, निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे तसेच अतिवेगाने वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.

यासोबतच वाहनामध्ये रिफ्लेक्टिव्ह कोन, बॅरिकेड टेप आणि वॉर्निंग ट्रँगल (Warning Triangle) यांसारखी आवश्यक रस्ता सुरक्षा साधने ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाहनाचा नोंदणी क्रमांक (नंबर प्लेट) स्पष्ट व सहज दिसेल असा असावा, तसेच अपघात किंवा हिट अँड रन सारखी घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याबाबत जनजागृती करण्यात आली.सर्व जड वाहनचालकांनी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट जवळ ठेवणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. वाहन बंद पडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत चालकाची दृश्यता वाढून अपघात टाळण्यास त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो, असेही स्पष्ट करण्यात आले.

यावेळी रस्ता सुरक्षा ही प्रत्येक वाहनचालकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश देत सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहनचालनेची सवय अंगीकारावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश वाहनचालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित वाहनचालनेला प्रोत्साहन देणे आणि रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी जनजागृती करणे हा होता.