24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ तुमसर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट आहार आणि अस्वच्छतेचा कारभार

तुमसर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट आहार आणि अस्वच्छतेचा कारभार

0
0

वैद्यकीय अधीक्षकांना दिले निवेदन: दोषींवर कारवाईची मागणी

​तुमसर (प्रतिनिधी): तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा आहार, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. या अव्यवस्थेविरोधात स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी आक्रमक भूमिका घेत रुग्णालय प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. जर आहारात सुधारणा न झाल्यास रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

​शासकीय मेन्यू कागदावरच; रुग्णांना अंडी नाकारली
शासकीय नियमांनुसार रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या आणि गंभीर रुग्णांना वैद्यकीय गरजेनुसार उच्च प्रथिनयुक्त आहार म्हणून उकडलेली अंडी देणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून शासनाचा अधिकृत मेन्यू धाब्यावर बसवला जात असून रुग्णांना अंडी दिली जात नाहीत. तसेच पुरवला जाणारा आहार अत्यंत निकृष्ट व खाण्यायोग्य नसून, रुग्णांना नाईलाजाने उपाशी राहावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

​तपासणी अधिकारी गायब; परिचारिकेवर प्रभारी भार
नियमानुसार रुग्णांना आहार वितरीत करण्यापूर्वी जबाबदार अधिकाऱ्याने त्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक असते. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात अधिकृत तपासणी अधिकारीच उपलब्ध नाही. प्रशासनाने या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीचा भार एका परिचारिकेवर (नर्स) सोपवून स्वतःची सुटका करून घेतली आहे.

​स्वच्छतेचा फज्जा; संसर्गाची भीती
रुग्णालयात दिवसातून तीन वेळा स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असताना, केवळ दोनदाच वरवरची स्वच्छता केली जाते. निकृष्ट दर्जाच्या फिनाईलचा वापर होत असल्याने रुग्णालयातच संसर्ग (इन्फेक्शन) पसरण्याची गंभीर भीती व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन, वैद्यकीय अधीक्षक व लोकप्रतिनिधी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक व रुग्णांकडून केला जात आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत भंडारा जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि तुमसर वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य उपसंचालक (नागपूर) व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदने पाठवण्यात आली आहेत. पुढील ७ दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख बालचंद बोन्द्रे, आरोग्य समितीचे परमानंद कटरे, सलमान पठाण, कैलास बिसने, प्रज्वल देशभ्रतार, सुशांत नागदेवे, नरेंद्र साटके, विक्की पांडेय व राजकुमार नैताम यांनी दिला आहे.

“स्वच्छता व आहाराबाबत तक्रार प्राप्त झाली असून आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ नोटीस बजावण्यात येत आहे. रुग्णांना दर्जेदार आहार देणे कंत्राटदारावर बंधनकारक असून, तपासणीत त्रुटी आढळल्यास नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.”
– डॉ. नितीन मिसुरकर, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, तुमसर.

​”शासकीय उपजिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देणे आणि आरोग्याशी खेळणे अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाचा अधिकृत मेन्यू धाब्यावर बसवून कंत्राटदार रुग्णांची हेळसांड करत आहे आणि रुग्णालय प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.”
–अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाउंडेशन तुमसर, जिल्हा भंडारा.

​”माझी शस्त्रक्रिया झाली असून मी शुक्रवारपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. परंतु, आहार देणाऱ्यांनी आजपर्यंत एकदाही उकडलेली अंडी दिली नाहीत. निकृष्ट दर्जाची भाजी आणि खाण्यायोग्य नसलेले अन्न दिल्याने आम्हाला उपाशी राहावे लागले. आता नाईलाजाने घरूनच जेवणाचा डब्बा मागवावा लागत आहे.”
– द्वारकाप्रसाद हातझाडे, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण, परसवाडा (सिहोरा).

blank