26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home Featured News कृषी दिन विशेष लेख;-‘हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक आधुनिक शेतीचे दूरदर्शी प्रणेते’

कृषी दिन विशेष लेख;-‘हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक आधुनिक शेतीचे दूरदर्शी प्रणेते’

0
11

“बळीराजा समृद्ध झाला तरच राज्य आणि देश समृद्ध होईल,” हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक यांची जयंती राज्यभर ‘कृषी दिन’ म्हणून साजरी केली जाते. कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. म्हणूनच त्यांना ‘हरितक्रांतीचे शिल्पकार’ आणि ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ म्हणून गौरविले जाते.

भारत हा कृषिप्रधान देश असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे शेती. मात्र बदलते हवामान, अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार अशा अनेक आव्हानांमुळे शेती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. अशा परिस्थितीत शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि बाजाराभिमुख शेती ही काळाची गरज ठरत आहे. या परिवर्तनाची पायाभरणी अनेक दशकांपूर्वी वसंतराव नाईक यांनी केली होती.

मुख्यमंत्री म्हणून सलग बारा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शेतीला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले. सिंचन प्रकल्पांचा विस्तार, कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न, सुधारित बियाण्यांचा प्रसार, रासायनिक खतांचा संतुलित वापर, कृषी संशोधनाला प्रोत्साहन आणि कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणातून त्यांनी उत्पादनवाढीचा मजबूत पाया घातला. त्यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांतीचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आणि अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.

सन १९७२ च्या भीषण दुष्काळाने महाराष्ट्रासमोर मोठे संकट निर्माण केले होते. या कठीण काळात वसंतराव नाईक यांनी केवळ तात्पुरत्या मदतकार्यांवर भर न देता दीर्घकालीन उपाययोजनांना प्राधान्य दिले. जलसंधारण, पाणलोट विकास, रोजगारनिर्मिती, सिंचन प्रकल्प, वृक्षलागवड आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी त्यांनी व्यापक धोरणे राबविली. याच धोरणांमुळे पुढील काळात दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता ग्रामीण भागात निर्माण झाली.

आजच्या काळात शेतीमध्ये मोठे बदल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, हवामान आधारित कृषी सल्ला, अचूक शेती , सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, पीक विविधीकरण आणि मूल्यवर्धन यामुळे शेती अधिक आधुनिक बनत आहे. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादनवाढ साधणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे शक्य होत आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा, कृषी पायाभूत सुविधा, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), ई-नाम, कृषी प्रक्रिया उद्योग, मृदा आरोग्य पत्रिका, कृषी सल्ला सेवा, कृषी महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमार्फत शेती अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न होत आहेत. बदलत्या परिस्थितीत कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, हवामानावर आधारित मार्गदर्शन आणि पीक व्यवस्थापनाचे सल्ले देत आहे.

कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, मातीचे आरोग्य टिकविणे, सेंद्रिय कर्ब वाढविणे, रासायनिक निविष्ठांचा संतुलित वापर, फळबाग, पशुपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन आणि कृषी प्रक्रिया उद्योग यांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. शेतीला उद्योगाची जोड मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळू शकते.

आजचा शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून आधुनिक उद्योजक म्हणूनही पुढे येत आहे. डिजिटल व्यवहार, ऑनलाइन बाजारपेठ, हवामान अंदाज, मोबाईलवरील कृषी सल्ला आणि आधुनिक यंत्रसामग्री यांच्या साहाय्याने तो नव्या युगाशी जुळवून घेत आहे. कृषी क्षेत्रात संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे.

कृषी दिन हा केवळ एका महान नेत्याच्या जयंतीचे स्मरण करण्याचा दिवस नाही; तर शेतीला अधिक समृद्ध, शाश्वत आणि स्पर्धात्मक बनविण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. वसंतराव नाईक यांनी दाखविलेल्या दूरदृष्टीचा वारसा जपत जलसंधारण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टाला विज्ञानाची जोड, उत्पादनाला बाजारपेठेची साथ आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ मिळाला तर महाराष्ट्राची कृषी अधिक समृद्ध होईल. वसंतराव नाईक यांच्या विचारांना अभिवादन करत, “समृद्ध शेतकरी – समृद्ध महाराष्ट्र” हा संकल्प प्रत्यक्षात आणणे, हीच कृषी दिनानिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरेल.

-अनिल कुरकुटे,जिल्हा माहिती कार्यालय वाशिम