29.7 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home विदर्भ मेंढ्यातील युवकाचे धाडस जीवावर बेतले,चिडलेल्या हत्तीने घेतला बळी

मेंढ्यातील युवकाचे धाडस जीवावर बेतले,चिडलेल्या हत्तीने घेतला बळी

0
8

गडचिरोली : गडचिरोली जवळच्या चांदाळा ते मेंढा मार्गावर रानटी नर (टस्कर) हत्तीने एका युवकाला ठार केले. गावाजवळ हत्ती आल्याची चाहुल लागल्यानंतर काही उत्साही लोक आपल्या मोबाईलने हत्तीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांनी आरडाओरड आणि गोंगाट केल्याने हत्ती चिडला आणि रस्त्यालगतच्या जंगलातून बाहेर येत जमलेल्या नागरिकांच्या मागे धावला. यामुळे झालेल्या पळापळीत धनराज पुंजीराम मडावी (35 वर्ष, रा.मेंढा बोदली) हा युवक हत्तीच्या तावडीत सापडला. हत्तीने त्याला सोंडेने उचलून पायाखाली चिरडले.

ही घटना बुधवारी संध्याकाळी 6.30 ते 7 वाजताच्या सुमारास घडली. मृत धनराज हा गावातील काही लोकांसोबत चांदाळा येथे गेला होता. परत येताना त्या परिसरात हत्ती आल्याची चाहुल लागल्याने गावातील काही उत्साही लोक जंगलातील हत्तीला न्याहाळत असल्याचे धनराजने पाहिले. त्यामुळे धनराजनेही हत्तीच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर लोकांनी त्याला पुढे जाण्यासाठी रोखले, पण धनराज ऐकत नव्हता. यातच लोकांची आरडाओरड पाहून हत्ती चिडला आणि तो अचानक जंगलातून बाहेर येत लोकांच्या मागे धावला. यावेळी बाकी लोक तर पळून गेले, पण धनराज मडावी हत्तीच्या तावडीत सापडला.

गुरवळा, विहीरगाव, चांदाळा परिसरात हत्तींचा कळप फिरत आहे. टस्कर हत्तीसुद्धा त्या कळपाच्या जवळपास फिरत आहे. त्यामुळे वनविभागाची चमू त्या हत्तींचा माग घेत नागरिकांना सावध करत आहे. परिसरात हत्ती असताना काय दक्षता घ्यावी याच्या सूचनाही वनविभाग करत आहे, मात्र नागरिक त्या सूचनांचे पालन करत नाही. ही घटना त्यातूनच घडल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेंढेकर यांनी सांगितले.