30.7 C
Gondiā
Sunday, July 12, 2026
Home विदर्भ महिला सक्षमीकरणासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारा – जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर

महिला सक्षमीकरणासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारा – जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
6

ईटखेडा 12 जुन : ईटखेडा येथे सबला प्रभाग संघाच्या वतीने आयोजित सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले.
सभेचे उद्घाटन झाल्यानंतर महिलांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सांगितले की, आजच्या काळात महिला केवळ बचत गटांच्या माध्यमातून बचत करण्यापुरत्या मर्यादित न राहता विविध लघुउद्योग, गृहउद्योग, कृषीपूरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच सेवा क्षेत्रातील व्यवसायांमध्ये सहभागी होणे ही काळाची गरज आहे. महिलांमध्ये उद्योजकतेची क्षमता असून शासनाच्या विविध योजनांद्वारे उपलब्ध होणाऱ्या आर्थिक सहाय्य, अनुदान आणि कर्ज सुविधांचा योग्य नियोजनपूर्वक वापर केल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात.
ते पुढे म्हणाले की, महिला बचत गटांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या निधीचा केवळ बचतीपुरता उपयोग न करता उत्पन्नवाढीचे व्यवसाय उभारण्यासाठी उपयोग करणे आवश्यक आहे. महिलांनी सामूहिक व्यवसाय उभारून रोजगारनिर्मिती करावी, स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतानाच समाजाच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. महिलांनी कौशल्य विकास प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास करून स्वयंपूर्ण उद्योजक म्हणून पुढे यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी महिलांना आत्मविश्वासाने पुढे येत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. सामूहिक प्रयत्न, आर्थिक शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर महिला स्वतःचे जीवनमान उंचावू शकतात, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला सबला महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा आशाताई नाकाडे, जिल्हा परिषद गोंदियाच्या महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, पंचायत समिती अर्जुनी-मोरगावचे उपसभापती संदीप कापगते, पंचायत समिती सदस्य नूतन सोनवाने व भाग्यश्री सयाम, सरपंच आशाताई झीलपे, वडेगावचे सरपंच श्रीकांत लोणारे, सबला प्रभाग संघाच्या सचिव कुंदा कुंभरे, कोषाध्यक्ष कविता शहारे तसेच नालिनीताई भावे, सुष्मा मेश्राम, सारिका लंजे, रेखा शेन्डे, रंजना राऊत, प्रज्ञा मलिक, मोहिनी चुरपार, उज्वला नेवारे, मनीषा टेंभुर्णे, ज्योती शहारे, योगिता भागरकर, आम्रपाली गोंडाणे, निरंजना लाडे यांच्यासह विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
सभेच्या शेवटी महिला सक्षमीकरणासाठी सामूहिक सहभाग, उद्योजकता विकास आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ घेण्याचा निर्धार उपस्थित महिलांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सबला प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.