31 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home विदर्भ रेलटोली उड्डाणपुलाचे गर्डर बसविण्याचे काम 3 दिवसांत सुरू करा-आमदार अग्रवाल

रेलटोली उड्डाणपुलाचे गर्डर बसविण्याचे काम 3 दिवसांत सुरू करा-आमदार अग्रवाल

0
21

गोंदिया : शहराच्या दोन भागांना जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाच्या जागी उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी आज नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक मुख्य अभियंत्यांसोबत बैठक घेऊन उड्डाणपुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे कडक निर्देश दिले.या बैठकीला आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह मुख्य अभियंता श्री. माने, उपमुख्य अभियंता , कार्यकारी अभियंता श्री. रामटेके तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामातील विलंबाबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यांनी सांगितले की, या उड्डाणपुलाचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, विभागाच्या दिरंगाईमुळे या कामास विलंब होत आहे. कॉलमसाठी आवश्यक असलेले स्टील गार्डर घटनास्थळी उपलब्ध असतानाही काम सुरू करण्यात विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच येत्या 2 ते 3 दिवसांत गार्डर बसविण्याचे काम सुरू करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.

आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना 31 ऑगस्टपर्यंत गार्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या अखत्यारीतील उर्वरित कामांना गती देण्यासाठी लवकरच रेल्वेचे महाव्यवस्थापक (GM) व विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील कामाला वेग देण्यात येईल, अशी माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली.