31.3 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home विदर्भ तृतीयपंथीयांशी भेदभाव न करता सन्मानाने जगू देणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार :...

तृतीयपंथीयांशी भेदभाव न करता सन्मानाने जगू देणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार : सचिव व्ही. जी. चौखंडे

0
11
वाशिममध्ये तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात

कायदेशीर हक्क, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि शासकीय योजनांची मिळाली माहिती; सर्वंकष आरोग्य तपासणीचाही लाभ

वाशिम, दि. १६ जुलै :“सर्वोच्च न्यायालयाचा ‘नालसा’ निर्णय आणि ‘तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९’ नुसार तृतीयपंथीय व्यक्तींना सर्व घटनात्मक अधिकार प्राप्त आहेत. समाजाने त्यांच्याशी कोणताही भेदभाव न करता त्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला पाहिजे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. जी. चौखंडे यांनी केले.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित तृतीयपंथीयांच्या जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा व शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.
या महत्त्वाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आयटीआयचे प्राचार्य संजय लोणसने उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भातील पहिल्या तृतीयपंथी वकील व कल्याण मंडळाच्या सदस्या ॲड. शिवानी संतोषराव सुरकार आणि जिल्हा तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्या श्रावणी हिंगासपुरे  याशिवाय जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक के. टी. तेलमोरे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सोनटक्के, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार, जिल्हा कोषागार अधिकारी बाळकृष्ण इंगोले आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पीयूष चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त पीयूष चव्हाण यांनी कार्यशाळेची रूपरेषा मांडली. तृतीयपंथीयांना आरोग्य सेवा, कायदेविषयक मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ॲड. शिवानी सुरकार यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्माईल योजना, ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित योजनांची सविस्तर माहिती दिली. तर अशासकीय सदस्या श्रावणी हिंगासपुरे यांनी तृतीयपंथीयांनी ट्रान्सजेंडर ओळखपत्र आणि बीजभांडवलाचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले. समाजाने समान संधी दिल्यास तृतीयपंथीय देशविकासात मोठे योगदान देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान कार्यक्रमात शाहीर धम्मानंद इंगोले यांनी “जगू द्या त्यांना, हलक्यात तोडू नका” या आपल्या प्रबोधनात्मक गीतातून सामाजिक समतेचा आणि संवेदनशीलतेचा संदेश दिला.
या सत्रात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनी तृतीयपंथीयांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सोनटक्के यांनी शिधापत्रिका मिळविण्याची सुलभ प्रक्रिया समजावून सांगितली. प्राचार्य संजय लोणसने यांनी आयटीआयमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांद्वारे रोजगाराच्या संधी कशा मिळवता येतील यावर प्रकाश टाकला. जिल्हा कोषागार अधिकारी बाळकृष्ण इंगोले यांनी अशा कार्यशाळांच्या उपयुक्ततेचे कौतुक केले, तर जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक के. टी. तेलमोरे यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज आणि अनुदान मिळवून स्वयंरोजगार सुरू करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेचा समारोप  आरोग्य शिबिराने झाला. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाकडून उपस्थित सर्व तृतीयपंथी बांधवांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे  संचालन वरिष्ठ लिपिक हरीष वानखेडे यांनी केले, तर समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते यांनी आभार मानले. या प्रसंगी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी-कर्मचारी, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी आणि तृतीयपंथीय  नागरिक उपस्थित होते.