23.8 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home विदर्भ बोटे येथे रस्त्यावरील मातीमुळे दोन आठवड्यांपासून गावकरी त्रस्त; लोकप्रतिनिधींचे ढिम्म दुर्लक्ष

बोटे येथे रस्त्यावरील मातीमुळे दोन आठवड्यांपासून गावकरी त्रस्त; लोकप्रतिनिधींचे ढिम्म दुर्लक्ष

0
47
  • वॉर्ड क्रमांक २ आणि ३ मधील गल्लीत सिमेंट रोडवर खोदकामाचा राडारोडा तसाच

गोरेगाव:तालुक्यातील ग्रामपंचायत बोटे येथे वॉर्ड क्रमांक २ आणि ३ मधील मुख्य गल्लीत सिमेंट रोडवर नाली उपसण्याचे काम करून गेल्या दोन आठवड्यांपासून खोदलेली माती रस्त्यावरच टाकून देण्यात आली आहे. या ढिसाळ कारभारामुळे येण्या-जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, या संदर्भात जाब विचारणाऱ्या गावकऱ्यांना सरपंचांनी थेट मुजोरीची भाषा वापरत “मला वाटेल तेव्हा काम करेन,” असे खडेबोल सुनावल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यावर मातीचे साम्राज्य, अपघाताची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, बोटे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र. २ आणि ३ मधील गल्लीत सिमेंट रोडच्या बाजूला नाली खोदण्याचे काम दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, नालीतून काढलेली संपूर्ण माती आणि गाळ कंत्राटदार व ग्राम प्रशासनाने रस्त्यावरच तसाच ठेवून दिला. गेल्या दोन हप्त्यांपासून ही माती रस्त्यावरच पडून असल्याने रस्ता अरुंद झाला असून, पावसाळ्याच्या दिवसांत चिखल होऊन ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना चालणेही कठीण झाले आहे.
लोकप्रतिनिधी ढिम्म; तक्रार करायला गेल्यावर गावकऱ्यांनाच दम!
या गंभीर समस्येबाबत गावातील जागरूक नागरिकांनी वॉर्ड सदस्य, उपसरपंच आणि थेट सरपंचांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, आठवडा उलटूनही रस्त्यावरील माती हटवण्यात आली नाही. उलट, या समस्येकडे जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांशी सरपंचांनी अत्यंत उर्मटपणे संवाद साधल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांमधून संताप, कारवाईची मागणी:
जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच जर अशी अरेरावीची भाषा वापरत असतील, तर दाद मागायची कोणाकडे? असा संतप्त सवाल बोटे गावातील नागरिक विचारत आहेत. या रस्त्यावरील माती तात्काळ हटवून गावकऱ्यांची समस्या दूर करावी आणि संबंधित मुजोर सरपंचांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.