23.3 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home विदर्भ १० वर्षांखालील एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची मागणी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना...

१० वर्षांखालील एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची मागणी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन

0
11

गोंदिया, २३ जुलै  -राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत १० वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही शासन सेवेत समायोजन करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि विधानपरिषद सदस्या डॉ. मनीषा फायंदे यांना निवेदन सादर करण्यात आले.

राज्य शासनाने नुकताच एनएचएम अंतर्गत सलग १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या सुमारे १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षितता, समकक्ष वेतनश्रेणी आणि शासन सेवकांप्रमाणे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, १० वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयातून वगळण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

महासंघाने दिलेल्या निवेदनात, १० वर्षांखालील एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य आणि सेवा सुरक्षिततेचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावे तसेच लवकरात लवकर नवीन शासन निर्णय काढून त्यांनाही शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय विविध शासकीय आस्थापनांमध्ये अल्प मानधनावर अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवादेखील नियमित करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या मागणीबाबत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही प्रतिनिधींना दिली.

निवेदन सादर करताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव गजानन थूल, सुमंत ढोबळे, डॉ. नम्रता सलूजा, मयूर भारद्वाज, निलेशकांत थूल, कुलभूषण मुरायते, प्रणव देवळे यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अनेक कर्मचारी उपस्थित होते.

blank