वेगळ्या गोमंत्रालयाची जोरदार मागणी; ६९ हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधानांना रवाना
गोंदिया :गौमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्यात यावे तसेच गायींच्या संरक्षण व संवर्धनासाठी स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज गोंदिया शहरात विविध सामाजिक, धार्मिक आणि गोसेवा संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. भगवे झेंडे आणि ‘गौमाता राष्ट्रमाता हो’ च्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
मोर्चात सहभागी झालेल्या सर्व संघटनांनी एकाच सुरात गौमातेला राष्ट्रीय दर्जा देण्याची आग्रही मागणी केली. गाय ही केवळ एक पशू नसून भारतीय संस्कृती, शेती आणि आरोग्याचा खरा आधार आहे; त्यामुळे तिला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देऊन तिचे पूर्ण रक्षण झाले पाहिजे, असा सूर वक्त्यांनी लावून धरला. यासोबतच गोशाळांना पुरेसे अनुदान, गोवंशाचे संगोपन आणि गोवंश हत्याबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करावे, अशी मागणीही यावेळी रेटण्यात आली.
या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून गोप्रेमी नागरिकांच्या गोळा केलेल्या तब्बल ६९ हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या नावाने तयार केलेले हे मागणी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य सरकारकडे रवाना करण्यात आले आहे.
विविध संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या महामोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आणि गावांमधून नागरिक व गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने या रास्त मागण्यांकडे तातडीने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या काळात यापेक्षाही तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
या मोर्चात गोविंदजी येडे, हंसराम रोकडे, रामकृष्ण बावनकरजी, कुंवरलालजी भगत, जोगा सर, ठाकरे सर, स्वदेश ठाकूर, गौरव वानखेडे, छत्रपाल पटले, सुनील गजभिये, गजानन राय, कोमलप्रसादजी गौतम, डॉ. प्रशांत कटरे, शंकरलालजी अग्रवाल, सूरज नसिने, महेश पांडे, जय चौरसिया, भगतजी, विक्की गोहरे, विवेक बैस, देवेश मिश्रा, हरीश अग्रवाल, अंकित कुलकर्णी, पंकज चौधरी, राजीव ठाकरेले, दीप्ती मिश्रा, सुनील तिवारी, अजित सिंग, रमेश अग्रवाल यांच्यासह शेकडो गोप्रेमी सहभागी झाले होते.





