चित्रा कापसे/तिरोडा-खरीप हंगामातील धानरोपणीचे काम सुरू असताना घोगरा–पाटीलटोला फिडर अंतर्गत घाटकुरोडा परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी यांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना सविस्तर निवेदन देत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना अखंड ८ तास कृषी वीजपुरवठा मिळणे अपेक्षित असताना घोगरा–पाटीलटोला फिडर अंतर्गत घाटकुरोडा परिसरातील अनेक डीपी, केबल, फेस व विद्युत बॉक्स अत्यंत नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
दि. २३, २४ व २५ जुलै रोजी डीपीची केबल जळाल्यामुळे अनेक तास वीजपुरवठा बंद होता. संबंधित कर्मचारी वेळेवर न पोहोचल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःच्या जबाबदारीवर केबल दुरुस्त करून वीजपुरवठा सुरू केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात जिल्हा परीषद सदस्य
किरणकुमार पारधी यांनी घाटकुरोडा व परिसरातील सर्व नादुरुस्त डीपी, केबल, फेस व बॉक्स नवीन साहित्य वापरून तातडीने दुरुस्त करावेत, घोगरा–पाटीलटोला फिडरची संपूर्ण तांत्रिक तपासणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरूपी दूर करावेत, शेतकऱ्यांना नियमानुसार अखंड ८ तास गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा द्यावा, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून तत्पर सेवा द्यावी तसेच निष्काळजी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नियमित देखभाल व तपासणीचे वेळापत्रक राबविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
महावितरणने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी यांनी दिला आहे.





