गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू तस्करी आणि विक्रीवर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे गडचिरोली व आष्टी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या धडक कारवायांमध्ये तब्बल २२ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये दोन चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
आरमोरी मार्गावर बलेनो कारमधून दारू तस्करी उघड (३० जुलै)
दिनांक ३० जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, आरमोरीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या एका संशयित पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी बलेनो कारला (क्र. एम.एच. ३३ ए.डी. ३१९२) आरमोरी रस्त्यावर नाकाबंदी करून थांबवण्यात आले.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत वाहनातून खालील मुद्रेमाल जप्त करण्यात आला:रॉयल स्टॅग व विविध कंपन्यांची देशी-विदेशी दारू आणि विस्कीच्या निपा.जुनी वापरती सुझुकी बलेनो कार (अंदाजे किंमत ५,००,०००/- रुपये).एकूण जप्त मुद्देमाल: ७,६०,८००/- रुपये.
गुन्हा दाखल: याप्रकरणी आरोपी १) प्रमोद दिलीप भोयर (३३, रा. गोकुलनगर, गडचिरोली) आणि २) मुकेश प्रकाश बोधलकर (३८, रा. गोकुलनगर, गडचिरोली) यांच्याविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि. दिपक मोहिते करत आहेत.
आष्टी हद्दीत बोलेरो पिकअपमधून १५ लाखांचा मुद्रेमाल जप्त (३१ जुलै)
दुसऱ्या एका कारवाईत, दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी चंद्रपूरहून येणारी पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एम.एच. ३४ बी.झेड. ७६१७) पोस्टे आष्टी हद्दीतील मौजा येणापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अडवण्यात आली.तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणावर अवैध साठा जप्त करण्यात आला:९० मिली देशी दारू, रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्लू, हायवर्ड ५००० व बडवाईसर मॅग्नम बिअरचे बॉक्स.जुनी वापरती महिंद्रा बोलेरो पिक अप (अंदाजे किंमत ५,००,०००/- रुपये).एकूण जप्त मुद्देमाल: १५,३८,६००/- रुपये.अटक व गुन्हा: याप्रकरणी मुख्य आरोपी अब्दुल फरहान शेख (२४, रा. जलनगर, ता. जि. चंद्रपूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पोस्टे आष्टी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. काशिनाथ सेडमाके करत आहेत.
पोलिसांचे प्रभावी नियंत्रण
सदर दोन्ही यशस्वी कारवाया पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. व सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, आष्टीचे प्रभारी अधिकारी पोनि. विशाल काळे, पोउपनि. काशिनाथ शेडमाके तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी पार पाडल्या. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यासाठी यापुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





