रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई; एका आरोपीला अटक, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
गोंदिया,दि. १ ऑगस्ट २०२६:जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पुन्हा एकदा धडक कारवाई करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेला २.०५ किलो हिरवा ओलसर गांजा, अँड्रॉइड मोबाईल तसेच इतर साहित्यासह एकूण २,१०,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या असून रामनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांच्या व्यापारावर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गड्डाटोली परिसरात ही यशस्वी कारवाई केली.
ओव्हरब्रिजखाली सापळा रचून कारवाई
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, मनीष दीपक रामटेके (वय २७, रा. गांधी वॉर्ड, गोंदिया) हा तरुण गड्डाटोली परिसरात गांजा विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गड्डाटोली येथील ओव्हरब्रिजखाली सापळा रचला. संशयितास ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडील दोन टिनच्या पेट्यांमध्ये ठेवलेल्या पिशवीत हिरवी ओलसर पाने, फुले व बिया मिश्रित २.०५ किलो गांजा आढळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल:गांजा (२.०५ किलो): ₹२,००,५००/-अँड्रॉइड मोबाईल: ₹१०,०००/-दोन टिनच्या पेट्या: ₹३००/-एकूण जप्त मुद्देमाल: ₹२,१०,८००/-याप्रकरणी आरोपी मनीष रामटेके याला अटक करून त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अभिषेक जंगमवार, सफौ राजू मिश्रा, पोहवा महेश मेहर, सुजित हलमारे, संजय चव्हाण, प्रकाश गायधने, सुबोध बिसेन, पोशि छगन विठ्ठले आणि चापोशि राम खंडारे यांनी पार पाडली.अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराविरोधात जिल्हा पोलिसांची ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.





