30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ लोकाभिमुख, पारदर्शक व संवेदनशील महसूल प्रशासनासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

लोकाभिमुख, पारदर्शक व संवेदनशील महसूल प्रशासनासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

0
7
महसूल दिन उत्साहात साजरा; उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव, लोकसेवेचा संकल्प
वाशिम, दि.2 ऑगस्ट : महसूल विभाग हा शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा भक्कम दुवा आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने लोकाभिमुख, पारदर्शक, संवेदनशील आणि उत्तरदायी प्रशासनाची जाणीव ठेवून नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून महसूल प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव, मुद्रांक जिल्हाधिकारी राजेश वजीरे, महसूल उपजिल्हाधिकारी प्रिया सुळे ,भूमी अभिलेखच्या जिल्हा अधीक्षक शिल्पा सानप, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महसूल दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महसूल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांच्या अडचणी तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडविण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजना आणि सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महसूल यंत्रणेने समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, कार्यातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता यामुळे प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी सांगितले.
महसूल दिनानिमित्त महसूल प्रशासनात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यतत्परतेच्या बळावर प्रशासन अधिक सक्षम होत असल्याचे सांगत त्यांनी गौरवप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या विविध कामकाजाचा आढावा घेत नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. महसूल प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोककेंद्रित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.