29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ दरेकसा येथील मलेरियाची साथ आटोक्यात; आरोग्य यंत्रणेकडून युद्धपातळीवर उपाययोजना

दरेकसा येथील मलेरियाची साथ आटोक्यात; आरोग्य यंत्रणेकडून युद्धपातळीवर उपाययोजना

0
16

गोंदिया:सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात जुलैच्या शेवटी पसरलेली हिवतापाची (मलेरिया) साथ आता पूर्णपणे आटोक्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत दरेकसा परिसरात हिवतापाचे तब्बल ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेने तातडीने चार पथकांच्या माध्यमातून राबवलेल्या प्रतिबंधात्मक मोहिमेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून, गेल्या दोन दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला दरेकसा परिसर घनदाट जंगल आणि डोंगराळ भागाचा आहे. या भागात दरवर्षी पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. जंगलातील झाडांच्या ढोलीत, पानांच्या बेचक्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोग्य यंत्रणेचा थेट कृती आराखडा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सालेकसाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल आत्राम व वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस गिरी यांनी गावात तातडीने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. आरडीके (RDK) किटच्या साहाय्याने रुग्णांच्या रक्ताचे नमुने जागेवरच तपासून उपचार सुरू करण्यात आले.झाडांच्या ढोलीतील डासोत्पत्ती रोखण्यासाठी त्यात माती आणि सिमेंट भरण्याचे काम वन विभाग व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सुरू आहे. तर इतर साचलेल्या पाण्यात कीटकनाशके व राईचे तेल टाकले जात आहे.

आकडेवारीवर एक नजर:

  • तपासलेली घरे: ४,४८८ (१९१ घरांत अळ्या आढळल्या)

  • तपासलेले पाण्याचे साठे: १३,५८८ कंटेनर (४३७ दूषित आढळले)

  • रक्त नमुने तपासणी: ७,२६७ लोक

  • एकूण बाधित रुग्ण: ५५ (सध्या एकही नवीन रुग्ण नाही)

गप्पी मासे अन् धूर फवारणीवर भर जैविक नियंत्रणासाठी परिसरातील विहिरी आणि साचलेल्या पाण्यात अळ्या खाणारे ‘गप्पी मासे’ सोडण्यात आले आहेत. २५ जुलैच्या घटनेनंतर २८ जुलै रोजी जि. प. सदस्या गीताताई लिल्हारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन गावागावांत फॉगिंग (धूर फवारणी) आणि स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच तेंदूपत्ता गोळा करणारे मजूर, आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि स्थलांतरित नागरिकांची ‘आशा’ सेविकांमार्फत रॅपिड किटद्वारे तपासणी केली जात आहे. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आणि परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.