29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीन ग्रामीण तीर्थक्षेत्रांना मान्यता

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीन ग्रामीण तीर्थक्षेत्रांना मान्यता

0
26
भंडारा, दि. २ : जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील तीन धार्मिक स्थळांना ‘क’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. यात साई मिशन श्री संत मणिराम बाबा मानवधर्म आश्रम, आकोट (ता. पवनी), मौजा सावरगाव (ता. लाखांदूर) येथील चुलबंद नदीवरील शंकर भगवान देवस्थान तसेच मौजा भुगाव-पंढरपूर (ता. लाखनी) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान यांचा समावेश आहे.
बैठकीस राज्यमंत्री (गृह-ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म) तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके,खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार राजेंद्र जैन, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार  सर्वश्री नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, परिणय फुके, अविनाश ब्राह्मणकर, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत १५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत मार्च २०२६ अखेर झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. गत आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी दिली.तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत जून २०२६ अखेरच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला.
 यावेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत संबंधित शासकीय यंत्रणांनी गांभीर्याने कार्यवाही करून समाधानकारक उत्तरे द्यावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयासंदर्भात लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध समस्या व अडचणींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन त्यावरील अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
तुमसर-मोहाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी वरठी येथे जागा उपलब्ध नसल्याचा मुद्दा आमदार राजू कारेमोरे यांनी उपस्थित केला. त्यावर पुढील १५ दिवसांत भूमी अभिलेख विभागामार्फत जागेची मोजणी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातील वाचनालये व ग्रंथालयांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून जिल्हा ग्रंथालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तीनही विधानसभा मतदारसंघांतील ग्रंथालयांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. भोयर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
ग्रामीण भागात जनसुविधा योजनेंतर्गत ज्या गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही, त्या गावांमध्ये स्मशानभूमीची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी-स्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर विद्यमान सीटी-स्कॅन मशीन तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावे तसेच नवीन सीटी-स्कॅन मशीनसाठी प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.
कृषी, ऊर्जा व वन विभागांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत प्रस्तावित सर्व कामांची यादी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना तसेच सर्व लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
 बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध विकासकामे, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रंथालय विकास तसेच जिल्हा नियोजनाशी संबंधित विषयांवर लोकप्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून विविध सूचना मांडल्या.