29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ मिटेवानी मुरुम चोरी प्रकरण: तहसीलदारांच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल नाही; नागरिकांमध्ये तीव्र असंतोष

मिटेवानी मुरुम चोरी प्रकरण: तहसीलदारांच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल नाही; नागरिकांमध्ये तीव्र असंतोष

0
16

​तुमसर (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजा मिटेवानी आणि दावेझरी परिसरात झालेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खनन व चोरीप्रकरणी महसूल प्रशासनाने स्पष्ट अहवाल देऊन आणि तहसीलदारांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही तुमसर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. राजकीय दबावापोटी दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत याप्रकरणी जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

​पंचनाम्यात चोरी सिद्ध, तरीही पोलीस ढिम्म…
​सदर माहितीनुसार, मिटेवानी व दावेझरी परिसरात एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी बुधराज पटले यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महसूल विभागाने जागेवर जाऊन पाहणी केली. मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त पंचनामा अहवालात बेकायदेशीर मुरुम चोरी झाल्याचे स्पष्ट सिद्ध झाले.
​या अहवासाच्या आधारे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, तुमसर यांनी ०८ जून २०२६ आणि स्मरणपत्र क्र. ५३३/२०२६ (दिनांक १६ जुलै २०२६) अन्वये तुमसर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना अज्ञात चोरट्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, महसूल प्रशासनाच्या अधिकृत पत्रांनाही तुमसर पोलिसांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.

​राजकीय दबावाचा संशय…
​तहसीलदार कार्यालयासारख्या जबाबदार दंडाधिकारी यंत्रणेच्या निर्देशानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, या प्रकरणात मोठा राजकीय दबाव असल्याचे आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा तीव्र संशय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी तुमसर पोलिसांनी मिटेवानी मुरुम चोरी प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. ​दंडाधिकाऱ्यांचे आदेश डावलून गुन्हा दाखल न करणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. अवैध उत्खनन करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६’ व इतर संबंधित फौजदारी कायद्यांनुसार कडक कारवाई करण्यात यावी अश्या मागण्या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आले आहे.
सदर निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही माहिती व उचित कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​”तहसीलदारांसारख्या दंडाधिकाऱ्यांचे थेट आदेश आणि पंचनाम्यात चोरी सिद्ध होऊनही पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल न करणे अत्यंत संतापजनक आहे. हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून राजकीय दबावापोटी चाललेला उघड-उघड पक्षपात आहे. शासनाच्या आणि पर्यावरणाच्या मालमत्तेची लूट करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही तात्काळ चौकशी झाली पाहिजे. जर पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई केली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.”
–अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाउंडेशन, तुमसर, जिल्हा भंडारा.