26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ मुर्री ते भागवत टोला बायपास मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, अपघातांची...

मुर्री ते भागवत टोला बायपास मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, अपघातांची टांगती तलवार!

0
27

​गोंदिया (विशेष प्रतिनिधी): तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा व महत्त्वाचा मानला जाणारा मुर्री ते भागवत टोला बायपास मार्ग सध्या भीषण खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावरून दररोज होणारी अवजड व जड वाहनांची वाहतूक, त्यातच सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या सरी यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याचे पूर्णपणे तीन-तेरा वाजले आहेत. संपूर्ण बायपास मार्गावर ठीकठिकाणी मोठमोठे आणि खोल खड्डे पडल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक व ‘मरणमार्ग’ ठरत आहे. मात्र, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​हा बायपास मार्ग शहराबाहेरून जड वाहतूक वळवण्यासाठी निर्माण करण्यात आला होता. दररोज शेकडो ट्रक, डंपर, ट्रेलर तसेच प्रवासी वाहने या मार्गावरून जात असतात. परंतु, डांबरीकरण उखडल्यामुळे व रस्त्यावर जागोजागी भलेमोठे खड्डे तयार झाल्यामुळे वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाण्याचे तळे साचले आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याचे आणि लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी तर या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे.
​या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना व स्थानिक ग्रामस्थांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघाताची भीती सतत डोक्यावर टांगती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) या संदर्भात वारंवार पूर्वकल्पना देऊनही विभागाचे अधिकारी ढिम्म हललेले नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून बोळवण करण्याचे कामही विभागाने केलेले नाही, त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
​दुसरीकडे, निवडणुकीच्या काळात विकासाच्या मोठ्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी आता या जनतेच्या मूलभूत समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.
​जर सार्वजनिक बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेऊन मुर्री ते भागवत टोला बायपास मार्गाची तात्काळ दुरुस्ती केली नाही आणि डांबरीकरण करून खड्डे बुजवले नाहीत, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी दिला आहे.