25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ अस्वलाच्या हल्ल्यात वनपालाचा मृत्यू

अस्वलाच्या हल्ल्यात वनपालाचा मृत्यू

0
159

गोंदिया ः न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यात कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या अचानक झालेल्या हल्ल्यात वनपालाचा जागीच मृत्यू झाला. शामू शरणागत (वय ४२, रा. तिरोडा) असे मृताचे नाव आहे.
वनपाल शामू शरणागत हे न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्याच्या उमरझरी प्रवेशद्वारावर नेहमीप्रमाणे बुधवारीदेखील आपली नियमित जबाबदारी पार पाडत होते. दरम्यान, जंगलाच्या परिसरातून अचानक एक अस्वल बाहेर आले आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणाची नोंद घेऊन वनविभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणीही पुढे येत आहे.
……………………………………..