गोंदिया,दि.०५ : शैक्षणिक सत्र 202६-2७ करिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेत शासकीय वसतिगृहांबरोबरच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पं.दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज
शासनाच्या http://hmasnew.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत 07 ते ३१ आँगस्ट 202६ अशी निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृह प्रमुखांकडे सादर करणे बंधनकारक आहे.
प्रवेश निकष व प्राधान्य
शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश गुणवत्तेनुसार व वसतिगृह क्षमतेनुसार दिला जाणार आहे. पात्रता असूनही वसतिगृहात जागा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयं व आधार या योजनांमधून प्रवेशासाठी विचारात घेतले जाईल. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विशेष जाती भटक्या जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह , येथील गृहपाल किंवा सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुडकर यांनी केले आहे.





